Ahmednagar District Hospital Fire : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. घटना घडली तेव्हा 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर सात जण भाजले गेल्याचं भोसले यांनी सांगितलं आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं यावेळी भोसले यांनी सांगितलं. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी संपर्क साधत तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशामन दलानं युद्धपातळीवर कार्य करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आगीनं होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ahmednagar Hospital Fire : इमारत नवी, वायरिंगही नवं, मग आग लागली कशी? हादरवणारी कहाणी!
शॉर्ट सर्किटनं आग लागली?
आयसीयूला आग लागल्याचं समजताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने कोल्हापूरवरुन रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही. प्रत्येक्षात गेल्यानंतर पाहणी करणार असल्याचं ते म्हणाले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने सरकारी मदत दिली जाईल. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमुळे टळली मोठी दुर्घटना
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूम विभागाला आगलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे दोन बंब तात्काळ रवाना झाली. आग लागल्यानंतर रुग्णालयात नर्स, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांनी रुग्णांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर सात जण गंभीर भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रुग्णालयात नेमकी आग कशी लागली?
अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला ही आग नेमकी कशी लागली याबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र चौकशीअंती आगीचं नेमकं कारण समोर येईल