अहिल्यानगर : पुण्यात वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले दिखावे याचीही चर्चा सुरू झाली. यावर अहिल्यानगरमधील मराठा समाजाने अत्यंत पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. तसेच लग्नातल्या बडेजावाला काट मारणारी एक आचारसंहिताच जाहीर केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर खडबडून जागा झालेल्या मराठा समाजातल्या विचारवंतांनी अहिल्यानगरात एक बैठक घेत अतिशय महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी पाऊल उचललं. लग्न साध्या पद्धतीने करा, हुंडा प्रथा बंद करा, प्रीवेडींग शूट बंद करा असे काही नियम या आचारसंहितेत घालून देण्यात आले आहेत. आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसंच आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 11 जणांची सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे.
Code Of Conduct For Wedding : मराठा समाजाच्या लग्न समारंभासाठी आचारसंहिता
1. लग्न सोहळा (100/200) मर्यादित लोकात केला जावा. 2. प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये.3. कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे. 4. लग्नात डीजे नको.पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना संधी द्या.5. कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत.6. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा. 7. हार घालताना नवरा नवरीला उचलू नका. 8. लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत. पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत. 9. लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात, पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत.10. लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये.11. लग्नात हुंडा देऊ-घेऊ नये. वडिलांची खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी.12. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा. 13. लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा.14. पैशासाठी सूनेचा छळ करू नये. 15. समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतीचा हात द्यावा. नुसत्या शुभेच्छा नकोत.16. जेवणात 5 हून अधिक पदार्थ नकोत.17. विविध कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भोजन प्रसंगी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, सुकी भोजन पाकीट व्यवस्था असावी. 18. दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करा. लग्न आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद, श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा. श्रद्धांजलीसाठी गरज वाटल्यास वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा.
विशेष म्हणजे असेच नियम याआधी आगरी समाजानेही तयार केले आहेत. कोकणातही सर्व समाजांच्या लग्नात कित्येक पिढ्या हुंडा, देणीघेणी, मानपान होत नाहीत. तसंच लग्नाचा खर्चही अर्धा अर्धा केला जातो. आता मराठा समाजानेही आचारसंहिता निर्माण करून फुकटच्या बडेजावाला पायबंद घातलाय ही खरोखर स्वागतार्ह बाब आहे.