Parbhani Farmers Agitation : परतीच्या पावसानं (Rain) राज्यातील विविध जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे देखील झाले नाहीत. त्यामुळं शेतकरी (Farmers) आक्रमक झाले आहेत. परभणी (Parbhani) जिल्ह्यातही परतीच्या पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे.  


परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानं वाहनांच्या लांब रांगा


परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. पिक विम्याचा निर्णय घेण्यात आला नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. मागच्या एक तासापासून परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील ब्राह्मणगाव फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी या आंदोलकानी केली. दरम्यान या आंदोलनामुळं दोन्ही बाजूनं जवळपास दोन-दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.




पावसामुळं सोयाबीन, कापूस, फळबागांचे प्रचंड नुकसान


मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर परभणी जिल्ह्यात (Parbhani District) आतापर्यंत सरासरीच्या 91 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळं सोयाबीन, कापुस, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पीक विमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 


परभणी जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या


शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. तसेच बँकांचे कर्ज झाल्यामुळं देखील अनेक शेतकरी तणावात आहेत. यातूनच काही ठिकाणी शेतकरी आत्महत्येसारखं पाऊल उचलत आहेत. परभणी जिल्ह्यातही एका तरुण शेतकऱ्यानं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात एक तर यवतमाळ एक आणि बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. तसेच विदर्भात देखील तीन शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा द्यावा, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळं आज शेतकऱ्यांनी रस्त्यावरुन उतरुन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं.


महत्त्वाच्या बातम्या :


Farmer suicide : धक्कादायक! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, परतीच्या पावसानं सोयाबीनचं झालं होतं नुकसान