Kisan Sabha Long March : किसान सभेच्या (Kisan Sabha) शेतकरी लाँग मार्चचा (long march) आज तिसरा दिवस आहे. हा मोर्चा मुंबईच्या (Mumbai) दिशेने येत आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी गावाजवळ मोर्चा पोहोचला आहे. दरम्यान, आज दुपारी तीन वाजता किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार होती. मात्र, ती बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता उद्या दुपारी होणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. याच मुद्यावरुन विधानसभेत गदारोळ झाला.
सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा : अजित पवार
शेतकरी एवढ्या रणरणत्या उन्हात मोर्चा काढत आहेत. नाशिकवरुन ते पायी मुंबईच्या दिशेने चालत येत आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ या मुद्यावर मार्ग काढावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत, सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी असे अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक : दादा भुसे
किसान सभेच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीला विविध खात्यांचे सचिव उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. आजची बैठक रद्द झाली आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे भुसे म्हणाले. आंदोलकांना मुंबईपर्यंत येण्याची वेळ पडणार नसल्याचेही भुसे म्हणाले. मागण्या मान्य झाल्या तर आहे त्या ठिकाणावरुन मोर्चा मागे घेऊन असे किसान सभेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
ठरलेली अचानक बैठक रद्द केली : विनोद निकोले
आमचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी येणार होते. पण अचानक ही बैठक रद्द झाल्याचे आमदार विनोद निकोले म्हणाले. हे आंदोलक 200 किलोमीटर चालत येणार आहेत. 2017 मध्येही असाच लाँग मार्च निघला होता. शेतकऱ्यांना काय वेदना होतात हे मला माहित असल्याचे निकोले म्हणाले. त्यामुळे सरकारने त्वरीत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करुन मार्ग काढावा असी मागणी निकोले यांनी केली आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्काच्या वन जमिनी, दिवसा वीज या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या किसान सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काल अनेक ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला.
महत्त्वाच्या बातम्या: