Devendra Fadnavis : जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत सन्मानाने हा तिरंगा फडकत राहील अशा प्रकारची प्रार्थना मी करत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपला तिरंगा झेंडा आपली निशाणी असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सरकार अॅग्री बिझनेस व्यवस्था उभारत आहे. तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सहा हजार कोटींचा निधी खर्च करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरमध्ये फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी फडणवीस बोलत होते. 


पंतप्रधानांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम केलं


शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी  राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. मग पीक विमा असो, कर्ज माफी योजना, कर्ज पुनर्गठन योजना अशा वेगवेगळ्या पद्धतीने सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचे फडणवीस म्हणाले. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशाचे प्रधानमंत्री मोदींनी दिल्लीमध्ये 500 विशेष पाहुणे बोलवले आहेत. ज्यामध्ये शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लोक आहेत, सामान्य कार्यकर्ते, सफाई कर्मचारी आहेत, बांधकाम कामगार आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा महत्त्व आणि तो साजरा करताना समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम माननीय प्रधानमंत्री यांनी केल्याचे फडणवीस म्हणाले. 


गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांचे मोठं शौर्य 


हर घर तिरंगा हे देखील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यासोबत मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या अंतर्गत आपल्या देशाप्रती आपल्या मातीप्रती एक सन्मानाची अभिमानाची भावना आपल्या मनात तयार होत आहे. मला विश्वास आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आपला प्रदेश हे दोन्ही शेवटच्या माणसाची स्वप्न पूर्ण करत विकासाकडे जातील, असे फडणवीस म्हणाले. एका गोष्टीचे समाधान आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळं मोठ्या प्रमाणात पदके मिळाली आहेत.  26 जानेवारीला पण मिळाली होती. या वर्षामध्ये 64 पदके मिळाली आहेत. देशात कदाचित सर्वाधिक पदके गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना मिळाली असल्याचे फडणवीस म्हणाले. 


गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा आमचा प्रयत्न 


अजूनही संघर्ष संपलेला नाही, भटकलेल्या एकही व्यक्ती बाहेर गेला असेल तर त्याला मुख्य धारेमध्ये आणावे लागेल. देश विघातक शक्ती देखील आता माओवाद्यांसोबत आहेत. त्यामुळं गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस सजग असल्याचे फडणवीस म्हणाले. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा आमचा प्रयत्न करत आहोत. अनेकांशी आमची चर्चा चाललेली आहे. मला विश्वास आहे की देशातील नेक्स्ट डेस्टिनेशन आम्ही गडचिरोलीला बनवू. नक्षलवाद्यांना भरती करता लोक मिळत नाहीत, आपल्या राज्यामध्ये आता नक्षलवादांना कोणाचही समर्थन मिळत नसल्याचे फडणवीस म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या : 


अजित पवारांच्या गुप्त भेटीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले फडणवीस?