बीड : पीकविमा भरण्याचा उद्या (31 जुलै) शेवटचा दिवस असल्याने बँकेत उद्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उद्या दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बँकांनीही जास्तीत जास्त काऊंटर सुरु करावे, असंही आवाहन कृषी आयुक्तांनी केलं आहे.

पीक विम्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उद्या बँकांमध्ये मोठी गर्दी होऊ शकते. तेव्हा कृषी सेवक, कृषी सहाय्यक कृषी मंडळ अधिकाऱ्यांनी दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच ज्या बँकांना शक्य आहे, त्या बँकेत जास्तीत जास्त काऊंटर सुरु करावेत, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांचा पीकविमा उतरवला जाईल, असेही आवाहन कृषी आयुक्त सुनील केंद्रेंकर यांनी यावेळी केलं आहे.

शिवाय, कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांनी यासर्व कामावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, पीक विम्याच्या ऑनलाईन पोर्टलचा बोजवारा उडाल्यामुळं शेतकरी बँकांसमोर दोन-दोन दिवस रांगेत उभे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी घाई करू, नये असं वक्तव्य काल कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांनी यांनी बुलडाण्यात केलं.

तसेच केंद्र सरकारकडून 15 दिवसांची मुदत वाढवून मिळावी प्रस्ताव पाठवला असल्याची माहितीही फुंडकरांनी दिली.