Solapur News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सध्या राज्यातील विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. दुधाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळं दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) युवा नेते डॅा. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते.
नेमक्या मागण्या काय?
1) दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे.
2) दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर 10-15 रुपये अनुदान जमा झालेच पाहिजे.
3) अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला अनुदान मिळाले पाहिजे.
या प्रमुख मागण्यांसाठी सांगोल्यात शेतकरी एकवटले होते. शेकापचे युवा नेते डॅा. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
राज्य सरकाच्या चुकीच्या धोरणामुळं दुधाचे दर कमी
निसर्गाची अवकृपा आणि सरकारची अपुरी मदत यामुळं शेतकरी पुर्णपणे आर्थिक अडचणीत आहेत. अशात शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी दूध व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले. पण अचानक राज्य सरकाच्या चुकीच्या धोरणामुळं दुधाचे दर कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने दुधाचे दर वाढवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी, दूध दरवाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी आणि पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी तहसीलदार संजय खडतरे, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
दूध दरात घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत
शेतीला जोडधंदा म्हणुन दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. दुधाला प्रतिलिटर 38 रुपये भाव मिळत होता, परंतु गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर टप्याटप्याने कमी होत 8 रुपयांनी कमी झाले आहेत. उन्हाळ्यात दूध उत्पादन (Milk Production) कमी होते आणि मागणी वाढते, त्यामुळे उन्हाळ्यात दुधाचे खरेदी दर (Milk Rates) वाढतात. या वर्षी मात्र दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. एकीकडे चाऱ्याचा खर्च वाढत असताना दुधाचे दर मात्र कमी होत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: