नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी दिवाणी फौजदारी न्यायालयाने दिलासा दिला आहे. 2008 मधील परप्रांतीयांविरोधातील आंदोलनप्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला आहे.

रेल्वे भरती परीक्षेदरम्यान 21 ऑक्टोबर 2008 रोजी मनसेने आंदोलन केलं होतं. यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील साईप्लाझा या हॉटेलवर दगडफेक केली होती. या प्रकरणी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे आणि आणखी सहा मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

इगतपुरी न्यायालयात तेव्हापासून या प्रकरणाचा खटला सुरु आहे. राज ठाकरे कोर्टात हजर होत नसल्याने त्यांना वारंवार समन्सही बजावण्यात आला होता. अखेर नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज स्वत: सुनावणीसाठी इगतपुरी न्यायालयात हजर झाले. अखेर न्यायदंडाधिकारी के आय खान यांनी राज ठाकरेंना जामीन मंजूर केला. माजी महापौर अशोक मूर्तडक हे जामीनदार होते.

राज ठाकरे यांच्या वतीने अॅड सयाजी नागरे आणि अॅड अजय शिर्के यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालय परिसरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.