नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्वाची बैठक पार पडली. या बैठकीचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील राजकारणाचा तसेच जागावाटप आणि वंचितच्या आघाडीमधील सबभागावर होता. या बैठकीत महाविकास आघाडीच्या संदर्भात आणि गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यायचं की नाही? या अनुषंगाने चर्चा झाली. जागा वाटपाच्या निर्णयावर जी काही चर्चा व्हायची आहे ती दिल्लीतच होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. काँग्रेसच्या राज्यातील कोणत्याही नेत्यांना याबाबत माहिती दिली जाणार नाही. 


जागावाटपाचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार


त्याचबरोबर राज्यामधील कोणत्या आणि किती आणि जागा लढवणार या संदर्भातील निर्णय सुद्धा काँग्रेसच्या हायकमांकडून घेतला जाणार आहे. हा निर्णय घेत असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सुद्धा चर्चेत सहभागी करून घेतलं जाईल. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निर्णय प्रक्रियेत नसतील. दुसरीकडे आजच्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या आघाडी समितीकडून राज्यातील महाविकास आघाडीमधील सहभागी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांबद्दलची मते जाणून घेतली त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी संदर्भातही मते जाणून घेतली. 


वंचित गांभीर्याने विचार करत नसल्याचा महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचा सूर 


या बैठकीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचा सूर हा वंचित सोबतचा फारसा आशादायक नसल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडीचा आजवरचा अनुभव पाहता वंचित गांभीर्याने विचार करत नसल्याचा सूर महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचा आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा निर्णय हा सुद्धा काँग्रेसच्या हायकमांडकडून घेतला जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला स्थान असणार नाही, असेच या बैठकीमधून स्पष्ट झालं आहे. वंचित बहुजन आघाडी बाबतचा निर्णयही काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वच घेणार आहे. महाराष्ट्रातील नेते या निर्णय प्रक्रियेत सुद्धा नसतील. 


जिंकून येण्याची पात्रता हाच एक निकष असणार


दरम्यान, आज काँग्रेस नेत्यांकडून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील अहवाल समितीला सादर करण्यात आला. या जिंकून येण्याची पात्रता हाच एक निकष असणार आहे. काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये जागावाटप हा कळीचा मुद्दा झाला असला तरी साधारणपणे आठ ते दहा जागांवर वाद होण्याची शक्यता आहे.  बाकीच्या जागांवर जागा वाटप सोप्या पद्धतीने होईल असाही अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची जाणून घेतलेली मते काँग्रेसची समिती काँग्रेसच्या हायकमांडला देणार आहे. 


'वंचित' ने जाहीर केला जागावाटपाचा फॉर्म्युला


दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या 48 जागांची समान विभागणी करावी. प्रत्येकी 12 जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. 


इतर महत्वाच्या बातम्या