वर्धा: वर्ध्यातील सावंगी (मेघे) इथल्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा 'हिपॅटायटीस बी'च्या लसीकरणानंतर रिअॅक्शन झाल्याने मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.  हिमानी रवींद्र मलोंडे, असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. हिमानी ही सावंगी येथील राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिंगची बी एससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.

शुक्रवारी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना 'हिपॅटायटीस बी' ही लस देण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास दहा विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाली. इतर विद्यार्थिनींच्या प्रकृती सुधारणा होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली, मात्र हिमानी मलोंडेची प्रकृती गंभीर झाल्यानं आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान आज पहाटे तिचा मृत्यू झाला.

हिमानीच्या मैत्रीणीनं लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडल्याची माहिती दिल्याचं वडिलांनी सांगितलं. तांत्रिक बाबी माहिती नसून औषधीत दोष असू शकतो, असा अंदाज हिमानीच्या वडिलांनी वर्तवला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी हिमानीच्या वडिलांनी केली आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसना संक्रमण होऊ नये म्हणून 'हिपॅटायटीस बी'च लसीकरण केलं जातं. शासनाच्या वतीनं याचा पुरवठा करण्यात आला होता.

लाखात एखाद्या व्यक्तीबाबत अशी घटना घडते. आमच्या विद्यार्थिनीसोबत घडली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रीय अॅडवर्स ड्रग रिअॅक्शन बोर्ड दिल्ली तसेच शासन स्तरावर जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली असून रुग्णालयाची प्रशासकीय समिती चौकशी करत आहे. शासन स्तरावर चौकशीचे आदेश दिले असून पोलिसांचीही चौकशी सुरू आहे. सर्व चौकशीला सहकार्य करू, असं रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.