बुलढाणा : शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील हे 1962 पासून संस्थानाची धुरा यशस्वीरित्या सांभाळून होते, त्यांनी संत गजानन महाराज संस्थानचं नाव सातासमुद्रापार नेलं ते आपल्या कार्यपद्धतीने. त्यांच्या निधनानंतर आता गजानन महाराज संस्थानच्या कारभाराची धुरा आता पुढे कुणाकडे? जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवशंकर पाटील यांनी मंदिर संस्थान उभारण्यासाठी कठीण परिश्रम घेतले. त्यानंतर सेवा, शिस्त व स्वच्छता या तीन बाबींमुळे शेगाव संस्थान हे कसं जगावेगळं असल्याचं जगासमोर दाखवून दिलं. आता अशीच व्यवस्था संस्थानची कोण पुढे नेऊ शकेल असा प्रश्न सर्वसामान्य भाविकांच्या मनात आहे.


शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान हे देशातील इतर संस्थांनांपेक्षा वेगळं आहे. संस्थानातर्फे जवळपास 42 सेवा प्रकल्प समाजासाठी राबविले जातात. अर्थातच या संस्थानाचा इतिहास हा संत गजानन महाराज हयात असतानाच सुरू झालाय. संत गजानन महाराजांच्या पैसा साठवू नका, यात्रा थांबवू नका या सिद्धांतानुसार संस्थानाचं कार्य चोख सुरू असतं. शेगाव संस्थानाच्या पंढरपूर, ओंकारेश्वर, आळंदी अशा ठिकाणी शाखा आहेत. या सर्व कारभारावर लक्ष ठेवण्याचं मुख्य काम संस्थानाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त यांच असतं. अर्थात आतापर्यंत कर्मयोगी शिवशंकर भाऊ हे काम 1962 पासून बघत होते. अलीकडे गेल्या 10 वर्षांपासून शिवशंकर भाऊंची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निळकंठ हे त्यांना मदत करत असत.


गेल्या अनेक वर्षांपासून कर्मवीर शिवशंकर पाटील अर्थात भाऊंची प्रकृती चढ उतार असल्याने त्यांच्या ज्येष्ठ चिरंजिवानी संस्थानची धुरा सांभाळत आणली. अर्थात म्हणतात ना शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी. यानुसार शिवशंकर पाटील यांचे सर्व गुण निळकंठ पाटील यांच्यात आहेत. ते संस्थानचे विश्वस्त आहेत. आणि गजानन विजय ग्रंथानुसार गणेश घरण्यातीलच व्यक्ती संस्थानचा कारभार सांभाळेल असं लिखित असल्याने आता संस्थनाची पुढील धुरा 1965 साली जन्मलेले  वाणिज्य शाखेत प्रविण्याने पदवीप्राप्त निळकंठ शिवशंकर पाटील हे आपल्या नियोजन कौशल्याने निपुण असल्याने यशस्वी सांभाळतील अशी भक्तांना आशा आहे. आता येणाऱ्या काळात विश्वस्तांची बैठक होऊन यात फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.


कर्मवीर शिवशंकर पाटील यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलीय. हयात असताना मात्र भाऊंनी अनेक राष्ट्रीय पुरस्कारांना विनम्रपणे नकार दिला होता. कारण महान कार्य करणाऱ्याला पुरस्काराची गरज वाटत नाही. असं हे महान कार्य आता त्यांचे ज्येष्ठ पुत्र निळकंठ पाटील पुढे नेतील याबाबतीत कुठल्याही भक्तांच्या मनात शंका नाही.