नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर नारळ मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत त्या संदर्भातली माहिती सूत्रांनी दिली आहे.


ग्रामीण भागात काम करणारा एक मंत्री आणि मुंबईतला एक मंत्री अशा दोघांना मंत्रिमंडळातून हटवलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी राज्यमंत्री म्हणून चांगलं काम करणाऱ्या एका मंत्र्याला कॅबिनेट पदी बढती मिळू शकते. पुढच्या चार पाच महिन्यात सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा बदल महत्त्वाचा वाटतो आहे. बदलांची चर्चा सुरू झाली की काँग्रेसमध्ये नाना पटोले मंत्री बनणार का असेही कयास सुरू होतात मात्र तूर्तास तरी ती शक्यता दिसत नाही.


नाना पटोले यांना महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देतानाच त्यांनी पक्षासाठी पूर्णवेळ काम करावं अशी इच्छा दिल्ली हायकमांडने व्यक्त केली होती. त्यामुळे ज्या दोन जागा रिक्त होतील त्या जातीय आणि प्रादेशिक संतुलनाच्या जोरावर भरल्या जातील असं दिसत आहे. हा बदल नेमका कधी होणार, याबद्दलची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या संमतीने लवकरच हा बदल होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.