परभणी : 'एमआयएम'नंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'वंदे मातरम्'ला विरोध केला आहे. राष्ट्रगीत असताना 'वंदे मातरम्'चा आग्रह कशाला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.


"वंदे मातरमला एमआयएमचाच नव्हे, तर आमचाही विरोध आहे. वंदे मातरम राष्ट्रगीत नाही, त्यामुळे त्याची कुणावरही सक्ती करता कामा नये. 'जन गण मन' हे अधिकृत राष्ट्रगीत असताना आणखी पर्यायी दुसरे गीत कशाला हवे? भाजपचा राष्ट्रगीतावर विश्वास नाही का?" असे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले. प्रकाश आंबेडकर आज परभणीत आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


"काँग्रेस पक्षाला आमच्याशी मैत्री करायची असती तर एवढ्यात हालचाल झाली असती. दोन महिन्यात दिल्लीतून कोणतेही संकेत नाहीत. याचा अर्थ असा की, कॉंग्रेसला मी आणि वंचित बहुजन चालत नाहीत. त्यामुळे लोकसभेच्या सर्व जागा आम्ही लढणार आहोत", अशी घोषणाही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली.


वंचित बहुजन आघाडीत असलेल्या धनगर समाजाला राष्ट्रवादीची साथ नको आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करायला आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिला.