नागपूर : महाराष्ट्रात 'युती' तुटून त्याचे घडलेले राजकीय प्रभाव आपण रोज पाहत असलो तरी महारष्ट्रापासून कोट्यवधी किलोमीटर लांब अवकाशात एक आगळी वेगळी 'युती' घडत आहे. ही युती आहे सौर मालिकेतील सर्वात मोठ्या 'गुरु' आणि सर्वात वेगळ्या 'शनी' ग्रहाची. खगोल शास्त्रीय दृष्टीकोनातून 400 वर्षानंतर घडणारी ही घटना विलक्षण आहे. तर ज्योतिष शास्त्रानुसार दोन्ही ग्रहांची मकर रासमधील ही युती अनेक उलथापालथी घडवू शकणार आहे.


आपल्या सौर मालिकेतील सर्वात मोठा ग्रह 'गुरु 'आणि आपल्या भोवती खास वलय असलेला ग्रह 'शनी'. तसं पाहिलं तर सौर मालिकेत दोघे एकमेकांचे शेजारी ( सौर मालिकेत गुरु नंतर शनीची कक्षा आहे. ) आहेत. मात्र, दोघांची सूर्याभोवती फिरण्याची गती वेगवगेळी असल्याने दोघे क्वचितच एकमेकांच्या शेजारी येतात. यंदा मात्र वेगळे घडत आहे. सूर्याभोवती 12 वर्षात एक परिभ्रमण करणारा गुरु आणि 30 वर्षात सूर्याची एक फेरी पूर्ण करणारा शनी यंदा पृथ्वीपासून पाहिल्यावर एका रेषेत येणार आहे. 21 डिसेंबर रोजी ही दुर्मिळ घटना घडणार आहे. तसे पाहिले तर गेले काही दिवस दोघे हळू हळू एकमेकांच्या जवळ येत आहे. मात्र 21 डिसेंबरच्या संध्याकाळी दोघे एकेमकांच्या इतके जवळ येणार की पृथ्वीवरून पाहिल्यावर ते दोघे एकावर एक असे 'दुहेरी ग्रह' भासू लागतील. त्यांनतर जास्त गती असलेला गुरु हळू हळू शनीच्या पुढे निघुन जाईल. खगोलशास्त्रानुसार ही घटना दुर्मिळच नाही, तर पृथ्वीवरून पाहण्यासाठी विलोभनीय ही असणार आहे. हे दोन्ही मोठे ग्रह दुर्बिणीतून पाहिल्यावर एकाच फ्रेम मध्ये दिसू शकणार आहे.


कसे घडणार आहे?


गुरु आणि शनीची वेगवेगळी गती पाहता पृथ्वीपासून पाहिल्यावर दोघे दर वीस वर्षांनी एकमेकांच्या जवळ येतात. मात्र, यंदा ते जेवढे जवळ ( जवळपास एकेमकांना ओव्हरलेप करतील ) येत आहे. असे घडायला 400 वर्ष लागतात. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते सुमारे 800 वर्षांपूर्वी म्हणजेच 4 मार्च 1226 ला माणसाने पहिल्यांदाच या घटनेचं अनुभव घेतला होता. मात्र, तेव्हा दुर्बिणी नव्हत्या. आता दर वीस वर्षांनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ येत असले तरी 21 डिसेंबर 2020 सारखा योग पुन्हा 400 वर्षांनीच येणार आहे. त्यामुळे ही दुर्मिळ आणि विलोभनीय खगोलीय घटना पाहण्यासाठी नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रासह सर्वच तारामंडळांनी खास सोय केली आहे. 11 इंच श्मिट कॅसग्रीन दुर्बिणीद्वारे खगोलप्रेमी गुरु आणि शनीच्या 'युती' चे दर्शन घेऊ शकणार आहे.


आता हे तर झाले खोगोलशास्त्राचे. दोन ग्रहांच्या युतीची ही दुर्मिळ घटना ज्योतिष शास्त्रानुसार काय घावणार आहे हे ही पाहणे महत्वाचे आहे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांच्या मते, गुरु मुळातच 'सात्विक' स्वभावाचा ग्रह असून शनी तुलनेने जास्त 'तामसी' स्वभावाचा ग्रह आहे. सध्या दोघे ही मकर रास (राशी ) मधून भ्रमण करत असून गुरुसाठी मकर रास नीच ( कमकुवत ) श्रेणीची रास आहे. तर शनी साठी मकर रास स्वगृही म्हणजेच बलस्थान असलेली रास आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या सध्याच्या मकर रास मधील भ्रमणाच्या या कालावधीत शनीची तामसी वृत्ती गुरूच्या सात्विक वृत्तीवर हावी होणार आहे. ज्योतिष अभ्यासकांचा अंदाज आहे की, हा काळ जगात अनेक अप्रत्याशित उलथापालथी घडवणारा असेल. दिलासा एवढाच की गुरु आणि शनी दोघे ही मकर रास मधून भ्रमण करताना 'मार्गी' या श्रेणीत आहे. त्यामुळे कुप्रभाव काहीसा कमी पडेल...


दोन्ही शास्त्र काहीही सांगत असले तरी सौर मालिकेत घडणाऱ्या या घटना अनेक शतकानंतर एवढ्या प्रभावीपणे घडत आहे. त्यामुळे आपण या विलोभनीय घटनेचा आनंद घेतला पाहिजे.