Gunratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची पोलिस कोठडी आज संपत आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण होणार की इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये त्यांना वर्ग केलं जाणार हे आज समजणार आहे. दुपारी दोन नंतर त्यांना न्यायालयात घेऊन जाण्यासाठी सातारा पोलीस लॉकअपमधून बाहेर काढतील.


115 आरोपी आज सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार


अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर चार आरोपींचा शुक्रवारी जामीन फेटाळला होता. यामध्ये सचितानंद पुरी, राम कातकडे, संकेत नेहरकर आणि रमेश गोरे यांचा समावेश आहे. या हल्ल्याप्रकरणातील सर्व म्हणजे 115 आरोपी आज सोमवारी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी संदीप गोडबोले आणि अजित मगरे यांना 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या चार आरोपींपैकी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी या हल्ल्यामध्ये सदावर्तेंचा हात असल्याचं कबुल केलं आहे. 


मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर आता बीडमध्ये गुन्हा दाखल


गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी संपण्याचा नाव नाही घेत आहेत. मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर आता बीडमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये  सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे मराठा समाजाला अत्याचारी समाज, असे संबोधित करणे. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.


आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी अडचणीत


वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना सातारा जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आधीच सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. दोन वर्षांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


एसटी कर्मचाऱ्यांचा थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल


एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं होतं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून या प्रकरणी कसून चौकशी सुरु आहे.