Aaditya Thackeray : युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात ते विविध कामांचं उद्घाटन, भूमिपुजन आणि सभा घेणार आहेत. मुख्य म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या दापोली येथील शिवसृष्टीचे उद्घाटन अखेर 30 मार्च रोजी होणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयानं आदित्य ठाकरे यांचा संभाव्य दौरा जाहिर केला असून त्यामध्ये कसा उल्लेख करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे 28 ते 30 मार्च 2022 दरम्यान कोकणातील रायगड, रत्नागिरी आण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 29 आणि 30 मार्च दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, गणपतीपुळे, गुहागर, चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये भेटीगाठी करणार आहेत.
कसा आहे आदित्य ठाकरेंचा रत्नागिरी जिल्हा दौरामंगळवार,दि. 29 मार्च 2022 रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यादरम्यान लांजा येथे उद्यानाचे उद्घाटन आणि सभा होणार आहे. त्यानंतर गणपतीपुळे येथे गणपतीपुळे येथे श्रींचे दर्शन आणि नळपाणी योजनेचे भूमीपूजन तसेच सभा. शिवाय गणपतीपपळे येथे बोट क्लबची पाहणी, एमटीडीसी गेस्ट हाऊस अपग्रेडेशनचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे धूप प्रतिबंधक बंधाराचे भूमीपूजन आणि सभा होणार आहे. दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवार दिनांक 30 मार्च 2022 रोजी चिपळूण येथे वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे आणि त्या ठिकाणच्या कामाची पाहणी करत आदित्य ठाकरे आढावा घेणार आहेत. त्यानंतर दापोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरणाचा कार्यक्रम करण्यासाठी आदित्य ठाकरे रवाना होतील.
दरम्यान, सध्या दापोली नगरपंचायतमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असून नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीवेळी कदम पिता-पुत्र यांना बाजूला सारत शिवसेनेतील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली होती. त्यानंतर कदम यांच्या शिवसेनेतील राजकीय भवितव्याबाबत देखील चर्चा सुरू होती. पण, आदित्य ठाकरे यांच्या 29 तारीखच्या दापोली दौऱ्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिल्यानंतर मात्र कदम यांच्यासाठी ही बाब सकारात्मक असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. पण, सध्या केले जात असलेले दावे आणि उद्घाटनाच्या तारखा यावरुन मात्र संभ्रम आणि अंतर्गत कुरघोडी समोर आली आहे.