रत्नागिरी : कोकणात शिवसेना असो किंवा महाविकास आघाडी यांच्यातील अंतर्गत वाद आणि कुरघोडी काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी राजकीय कुरघो़डीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली चर्चेत आलं होतं. शिवाय, शिवसेनेचे माजी मंत्री आणि नेते रामदास कदम आणि त्यांचा आमदार पुत्र योगेश कदम यांच्या राजकीय भवितव्याबाबत देखील चर्चा रंगली होती. पण, हेच दापोली आणि वाद पुन्हा एकदा नव्याने चव्हाट्यावर आले आहेत. यावेळी कारण ठरलं आहे ते दापोलीत उभारल्या गेलेल्या शिवसृष्टीचे आणि पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा. शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार योगेश कदम यांनी दिली होती. पण, आता मात्र सदरचा कार्यक्रम पालकमंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती माजी आमदार संजय कदम यांनी आघाडीतर्फे दोन दिवसांपूर्वी दिली आहे. शिवाय, 26 मार्च रोजी सदरचा कार्यक्रम पार पडेल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. त्यामुळे एकूण परस्पर विरोधी दाव्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
सध्या दापोली नगरपंचायतमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असून नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीवेळी कदम पिता-पुत्र यांना बाजूला सारत शिवसेनेतील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली होती. त्यानंतर कदम यांच्या शिवसेनेतील राजकीय भवितव्याबाबत देखील चर्चा सुरू होती. पण, आदित्य ठाकरे यांच्या 29 तारीखच्या दापोली दौऱ्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिल्यानंतर मात्र कदम यांच्यासाठी ही बाब सकारात्मक असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. पण, सध्या केले जात असलेले दावे आणि उद्घाटनाच्या तारखा यावरुन मात्र संभ्रम आणि अंतर्गत कुरघोडी समोर आली आहे.
तारखांचे परस्पर विरोधी दावे
दापोली येथे शिवसृष्टी उभारली असून त्याच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे 29 मार्च रोजी येथील अशी माहिती योगेश कदम यांनी दिली होती. पण, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवसृष्टीचे उद्घाटन हे 26 मार्च रोजी होणार असून यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती आघाडीतर्फे दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील विसंवाद आणि अंतर्गत बंडाळी या बाबी समोर आल्या आहेत.
कदमांना बाजूला का सारलं?
अनिल परब. परिवहन मंत्री आणि मातोश्रीच्या जवळचं प्रस्थ. दरम्यान, परब यांनी कोरोना काळात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी परबांवर हल्ला चढवला. त्याच प्रकरणात रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप मनसेकडून समोर आणली गेली. या ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हारयल देखील झाल्या. त्यानंतर मात्र कोकणातील राजकारण बदललं. दापोली नगरपंचायत निवडणुकीवेळी माजी मंत्री, आमदार आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना डावललं गेलं. शिवाय, त्यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांना देखील या निवडणुकीपासून लांब ठेवत संपूर्ण जबाबदारी शिवेसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या खांद्यावर दिली गेली. त्यामुळे सात वर्षे शिवसेनेत दुर्लक्षित असलेल्या दळवींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरु झाली. त्याचवेळी कदम पिता-पुत्रांच्या राजकीय भवितव्याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. पण, असं असलं तरी आदित्य ठाकरे 29 मार्च रोजी दापोलीत येणार अशी माहिती योगेश कदम यांनी दिल्यामुळे ही बाब त्यांच्यासाठी सकारात्मक असल्याचं बोललं जात होतं. पण, आता मात्र दौऱ्यावरुन दावे-प्रतिदावे आणि सांगितल्या जात असलेल्या तारखांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
आदित्य यांचा दौरा लटकला?
दरम्यान, या वादात आदित्य ठाकरे यांचा दौरा लटकला का? अशी चर्चा देखील सुरु आहे. मुख्य बाब म्हणजे आघाडीमार्फत उद्घाटन केलं जात असलं तरी योगेश कदम यांचं योगदान नाकारता येणार नसल्याची प्रतिक्रिया दापोलीसह जिल्ह्यातील काही वरिष्ठ पत्रकार, राजकीय जाणकार देतात.