मुंबई : भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीहून शिवसेना आमदारांशी चर्चा करण्यासाठी मालडच्या रीट्रीट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. चर्चेनंतर आदित्य ठाकरे रीट्रीट हॉटेलमध्येच मुक्कामाला आहेत.


राज्यात सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला अखेर निमंत्रण दिलं आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला राज्यपालांकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, भाजपकडून सत्तास्थापनेबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्ष पाहता भाजप राज्यपालांचं निमंत्रण स्वीकारुन बहुमत कसं सिद्ध करणार का? हे पाहावं लागणार आहे.

भाजपला निमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहे. शिवसेनेच्या आमदारांशी कुणीही संपर्क करु नये, यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. शिवसेनेने आमदारांची सर्व जबाबदारी खासदार अनिल देसाई, गजानन किर्तीकर, मिलिंद नार्वेकर, रामदास कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांची मालाड येथील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदारांशी चर्चा केली. चर्चेनंतर आदित्य ठाकरे रीट्रीट हॉटेलमध्येच मुक्कामाला आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 8 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेत सेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढं शिवसेनेची भूमिका काय असेल याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यात सत्ता स्थापन करायची की नाही, यावर चर्चा होणार आहे. या चर्चेननंतर सत्तास्थापनेबद्दल निर्णय होणार आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 8 नोव्हेंबरला राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांनी नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना फडणवीस यांना केली. राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजपच्याच नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर उद्धव ठाकरेंनीही शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपच्या पाठिंब्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात कुणाचं सरकार येणार आणि कोण मुख्यंमत्री होणार याची सर्वांना उत्सुकता आहे.