मुंबई : शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज शिवसेना भवनमध्ये बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना संबोधित केलं. आपण मित्रपक्षाला शत्रू पक्ष मानत नाही. अमित शाहांसोबतच्या बैठकीत जे ठरलंय ते करावं, आम्ही स्थिर सरकार देऊ, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.


तर मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये असं वक्तव्य करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सत्तास्थापनेची चर्चा फिसकटली आहे. पण मला खात्री आहे, सगळं सुरळीत होईल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कुणी मुख्यमंत्री पदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचं समजण्याचं कारण नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.


काय म्हणाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?


शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता. अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेसोबत कधीही चर्चा झाली नव्हती. मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता, मात्र त्याबाबत चर्चा झाली नव्हती, असं अमित शाह यांनीही सांगितलं आहे. दिवाळीनिमित्त पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारताना सत्तास्थापनेच्या वाटाघाटीबद्दलच्या प्रश्नावर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यामुळे नाराज झाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.





शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे


दरम्यान शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली आहे. शिवसेना भवनात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. 2014 मध्येही शिवसेना आमदारांनी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केला होता. आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर पाच आमदारांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. तर शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी सुनील प्रभूंची निवड करण्यात आली आहे.



संबंधित बातम्या