अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत : सुनील तटकरे
एबीपी माझा वेब टीम | 31 Mar 2018 08:38 AM (IST)
या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मुंबई : रायगडावर होणाऱ्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजनाशी आपला वैयक्तिक संबंध नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलं. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ''शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 123 वर्षांपासून केलं जातं. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, शरद पवार अशा अनेक मान्यवरांनी आजपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे,'' असंही सुनील तटकरेंनी म्हटलं आहे. ''जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रायगड पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्हा परिषदेकडून पूजा निधीला कार्यक्रमासाठी दरवर्षी निधी दिला जातो. जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने अदिती तटकरे यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत आहे. अदिती तटकरेंनी हा कार्यक्रम आयोजित केलेला नाही. यावरुन विपर्यास केला जातोय,'' असंही सुनील तटकरे म्हणाले.