Gautam Adani Meets Sharad Pawar: उद्योगपती गौतम अदानी यांनी गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी (7 जुलै) रात्री 9 ते 12 गौतम अदानी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचे समजते. अदानींच्या वाढलेल्या भेटीगाठी आणि राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता यांचा एकमेकांशी संबंध तर नाही ना? अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सिल्व्हर ओक येथील भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्यावर बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादीमधून सरकारमध्ये गेलेल्या गटावरून नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
गौतमी अदान यांनी एप्रिलच्या मध्यात रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर 1 जून रोजी सुद्धा त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे पवार आणि अदानींमधील भेटींमधील वेळ आणि अंतर याचा विचार करता राजकीय संदेशाची देवाणघेवाण तर नसेल ना? असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या बंडाळीत केंद्रीय नेतृत्वाचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनीही आपल्या भाषणातून भाजपसोबत जाण्यासाठी प्रयत्न सुरु होते, याचा दावा केला होता. दुसरीकडे, फुटीर गटामधील नेते प्रफुल्ल पटेल यांचेही राजकारणातील भाजप नेत्यांशी आणि उद्योग जगतात असलेली ऊठबस पाहता ही अदानी आणि शरद पवार यांची भेट नक्कीच फक्त भेट नसून त्यामागे अर्थ दडल्याची चर्चा आहे.
पवारांचे एक वक्तव्य अन् अदानींविरोधात विरोधाची धार बोथट!
दरम्यान, शरद पवार यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हिंडेनबर्गच्या अहवालासंदर्भात अदानींविरोधातील जेपीसी चौकशीला विरोध केला. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली होतीच, पण विरोधातील हवा सुद्धा कमी केली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच अदानी पवारांच्या भेटीला पोहोचले होते. अदानी समूहावरील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्गच्या अहवालाच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीच्या विरोधात असल्याचे सांगत शरद पवार यांनी अदानींना "लक्ष्य" केलं जात असल्याचे म्हटले होते.
NDTV या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, (ज्यामध्ये अदानी समूहाचे बहुसंख्य भागधारक आहेत) पवारांनी जेपीसी चौकशीच्या काँग्रेसच्या मागणीपासून स्वत:ला दूर केले होते. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी या प्रकरणावर संसदेचे कामकाज ठप्प करण्यावर ते सहमत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे विरोधकांशी संबंध तोडून पवारांच्या भूमिकेने महाराष्ट्रासह देशातील विरोधी पक्षांच्या ऐक्याबद्दल शंका निर्माण झाली होती. आता थेट राष्ट्रवादीमध्येच खिंडार पडल्याने या भेटीत फुटीर गटाच्या चालीवरून उभयंतांमध्ये चर्चा झाली की? शरद पवार यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न होता, याबाबतही चर्चा सुरु झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या