35 गावांच्या प्रश्नासाठी दीपालीचं उपोषण
अहमदनगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी दीपाली सय्यदचं आमरण उपोषण सुरु आहे. अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न साकळाई योजनेतून सुटणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दीपालीने उपोषण सुरु केलं आहे. जो पर्यंत साकळाई योजनेला मंजुरी मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार असल्याचं दीपाली सय्यदने सांगितलं.
काही लोक सेल्फी काढण्यात व्यस्त : मानसी नाईक
दीपाली सय्यद आणि मानसी नाईक या खूप जवळच्या मैत्रिणी असल्याने उपोषणस्थळी दाखल होताच, दीपालीची परिस्थिती पाहून मानसी भावूक झाली. दिपलीच्या गळ्यात पडून मानसीने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. पाण्यासाठी सरकारकडे भीक मागण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही, अशी खंत मानसी नाईकने व्यक्त केली. तसंच काही लोक सेल्फी काढण्यात आणि सोशल मीडियावर संदेश देण्यात व्यस्त असल्याने नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतं, असा टोलाही मानसी नाईकने जलसपदामंत्री गिरीश महाजन यांना लगावला.