औरंगाबाद : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत औरंगाबाद शहरातील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये बैठक घेतली. या बैठकीला निवडक उपस्थिती असल्याने बंद दाराआड झालेल्या या गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या बैठकीत संघाने भाजपला सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली असल्याचीही चर्चा सुरू आहे.


औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरात असलेलं मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या गुप्त बैठक आज सकाळी झाली.  बैठकीला  चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे,  गिरीष महाजन, हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, बबनराव लोणीकर, जयकुमार रावल हे बैठकीला हजर होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही बैठक राजकीय नव्हती असं जरी सांगितलं असलं तरी या बैठकीत राजकीय विचार मंथन झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. ही बैठक मराठवाडा आणि खान्देशातील विधानसभेच्या जागांवर सखोल चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याचीही माहिती समोर आली. मराठवाडा आणि खान्देशात भाजपचे असलेले मंत्री आणि खासदार त्यांची असलेली कामगिरी त्यांच्या झालेल्या चुका त्यांचा विधानसभेवर काय परिणाम होऊ शकतो. मराठवाडा आणि खान्देशात मराठा क्रांती मोर्चा, भीमा कोरेगाव दंगल, मराठा आरक्षण, नाराज असलेला ओबीसी वर्ग आणि वंचित बहुजन आघाडीने बिघडवलेली राजकीय समीकरणे यावरही विस्तृत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय बाबतीत हस्तक्षेप करत नाही अशी चर्चा होती. पण निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप सोबत गुप्त स्वरूपाच्या समन्वय बैठका घेऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेडगेवार रुग्णालयात अशीच एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. ज्या बैठकीनंतर लोकसभेला मराठवाड्यात भाजपची ताकत वाढली होती. आता विधानसभेलाही संघाने ही गुप्त बैठक घेतल्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा आणि खान्देशात राजकीय गणिते बदलतील का अशी चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीमुळे भाजपचे पदाधिकारी जितके सुखावले असतील तितकाच विरोधकांनी या बैठकीचा धसका घेतला आहे.