नागपूर : नागपुरच्या हिवरी नगर परिसरात आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेच्या स्थानापासून काही अंतरावर असलेल्या शिवाजी चौकावर राष्ट्रवादीच्या स्थानिक युवा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भित्तीचित्राला माल्यार्पणाचा कार्यक्रम ठेवला होता. तर शिवाजी चौकावर रस्त्याच्या पलीकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती (स्कॉलरशीप) च्या मुद्द्यावर आंदोलन करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पक्षाशी संबंधित असलेल्या तरुणांनाच ही शिष्यवृत्ती देत असल्याचा भाजयुमोचा आरोप होता.
पत्रकार परिषदेसाठी सुप्रिया सुळे यांचा ताफा हिवरीनगर परिसरातल्या शिवाजी चौकात दाखल झाल्यावर शिवाजी महाराज यांच्या भित्तिचित्रापासून काही अंतरावर कारमधून उतरल्या. जवळच घोषणाबाजी करणारे भाजयुमोचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहे असं समजून सुप्रिया सुळे रस्ता ओलांडून त्यांच्याकडे चालून गेल्या. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात होणारी घोषणाबाजी आणि पवार कुटुंबियांच्या विरोधात असलेले बॅनर पाहून त्यांना आपली चूक लक्षात आली. मात्र, तरीही सुप्रिया सुळे तिथून परतल्या नाही तर धाडसाने पुढे गेल्या आणि त्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन ते का आंदोलन करत आहे असे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना आंदोलनकर्त्यांच्या खूप जवळ जाऊ दिले नाही. हे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असून शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर आंदोलन करत असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांना दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांना लक्ष घालण्याची सूचना करेल असे आश्वासन दिले. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उभे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तीचित्राकडे गेल्या. तिथे त्यांनी माल्यार्पण केले आणि त्यानंतर ते पुन्हा कारमध्ये बसून पत्रकार परिषदेच्या स्थानाच्या दिशेने निघाल्या.
अचानक सुप्रिया सुळे आपल्या आंदोलनाच्या स्थानावर आल्याने भाजयुमोचे कार्यकर्तेही काही काळासाठी गोंधळले होते. सुप्रिया सुळे आपल्याकडे चालून येत आहे हे पाहून विरोधात घोषणा द्यावी की काय करावं असं त्यांना सुचत नव्हते. अखेरीस त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावत सुप्रिया सुळे यांना काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. शिवाजी महाराजांच्या भित्तीचित्राला माल्यार्पण केल्यानंतर पत्रकार परिषदेत जात असतानाही सुप्रिया सुळे यांनी आपली कार पुन्हा भाजयुमो कार्यकर्त्यांच्या जवळ थांबवून यापैकी एकाला माझ्यासोबत चर्चेसाठी घेऊन यावं असं पोलिसांना सांगितलं.
विशेष म्हणजे शिवाजी चौकवर महाराजांच्या भित्तीचित्राच्या माल्यार्पण स्थानी राष्ट्रवादीचे मोजके युवा कार्यकर्ते होते. तर भाजयुमोचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत होते. तरी सुप्रिया सुळे यांच्या पवित्र्याने भाजयुमो कार्यकर्ते गोंधळले होते, विरोध करावं की सुप्रिया सुळे आपल्याला ऐकायला पुढे आल्यावर समस्या सांगावी अशी गोची त्यांची झाली होती. पोलिसांची मात्र या सर्व प्रकरणात चांगलीच दमछाक झाली.