बीड : बीडमध्ये सात मुली असतानाही मुलाच्या हट्टापायी आठव्यांदा बाळंतपणाला सामोऱ्या जाणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. 38 वर्षीय मीरा रामेश्वर एखंडे असं दुर्दैवी महिलेचं नाव आहे. मीरा एखंडे यांना आठव्यांदा प्रसूतीसाठी माजलगाव मधल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र बाळंतपणा वेळीच रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. यावेळी तिच्या गर्भात असलेल्या बाळाचाही दुर्दैवी अंत झाला.

मीरा एखंडे यांना अगोदर सात मुली आहेत. त्या पुन्हा आठव्यांदा गर्भवती राहिल्या. शुक्रवारी त्यांना त्रास होऊ लागल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. रात्री सात वाजण्याच्या दरम्यान त्यांना प्रसुतीसाठी घेण्यात आले. प्रसुतीदरम्यान मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. ही बाब डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ रक्त उपलब्ध केले.

रक्त चढविण्यास सुरूवातही झाली. मात्र, रक्तस्त्राव काही केल्या थांबत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ शहरातील इतर स्त्रीरोग तज्ज्ञांना पाचारण केले. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी अनिल परदेशी, डॉ. गजानन रूद्रवार व डॉ. राजेश रूद्रवार तसेच येथे असलेल्या परिचरिकांनी तब्बल तीन तास तिच्यावर उपचार केले.

मात्र, सात मुलींच्या पाठीवर जन्माला येणाऱ्या मुलगा आणि त्याच्या आईला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.