हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथे मोबाईलवर लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्या सात जणांवर बुधवारी आखाडा बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 28 हजार रुपये रोख व सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे मोबाईलवर लुडो खेळणाऱ्यावर कारवाई करण्याची महाराष्ट्रातील बहुतेक पहिलीच कारवाई आहे.
चुंचा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एका लिंबाच्या झाडाखाली काहीजण मोबाईलवर पैसे लावून लुडो हा डिजिटल जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने आज दुपारी साध्या वेशात जावून छापा टाकला.
यामध्ये संजय परसराम मोहिते, सुनील कनके, गणपत पवार, परसराम जाधव, पांडूरंग चंद्रवंशी, सय्यद आरेफ, रामराव शेळके हे लुडो जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 28 हजार रुपये व 30 हजार रुपयांचे सहा मोबाईल जप्त केले आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आखाडा बाळापूर परिसरात मागील काही दिवसात जुगार अड्ड्यावर छापे टाकले जात असताना डिजिटल जुगाराचा नवा फंडा सुरु झाला आहे. पोलिसांच्या पथकाने हा फंडाही उद्ध्वस्त केला आहे.
डिजिटल जुगार अड्ड्यावर छापा, लुडो खेळणाऱ्यांवर महाराष्ट्रातील पहिली कारवाई
एबीपी माझा वेब टीम Updated at: 21 Nov 2018 07:49 PM (IST)