शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. बी. घात यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवाय अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही खात्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला 10 एप्रिल रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र महिलेला 18 तास ताटकळत बसवून ठेवलं आणि गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याची तक्रार देण्यासाठी महिला उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनला गेली होती. ही महिला शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला गेली. मात्र तिची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही.
तपास अधिकारी दिवसभरात बदलत राहिले. शेवटी या महिलेने रात्री अडीच वाजता पोलीस मदत केंद्राला फोन केला. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी कंटाळून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ही महिला निघून गेली. सकाळी अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत महिलेला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं गेलं.
पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. या महिलेच्या मूळ तक्रारीवर तब्बल पाच दिवसांनंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर संबंधितांवर आज कारवाई करण्यात आली.
संबंधित बातमी :