अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून हत्या प्रकरणातील आरोपीनं पलायन केलं आहे. प्रवीण खरचंद असं या आरोपीचं नाव आहे. नेवासामधील वकिल रियाज पठाण हत्या प्रकरणातील हा आरोपी होता.
पलायन केलेला आरोपी हा लष्करी गँगचा सदस्य होता. लष्करी गँगचं नगर जिल्ह्यात वर्चस्व होतं. शनिवारी पहाटे तब्येत बिघडल्यानं प्रवीण खरचंदला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी पहाटे पोलिसांना गुंगारा देत बेड्यांसहित आरोपीनं पलायन केलं. पलायन केलेल्या प्रवीणचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
दरम्यान काल शनिवारी अहमदनगरमध्येच कोर्टाच्या आवारात कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.