राहाता (अहमदनगर) : राहाता तालुक्यातील लोणीत पत्नी, दोन मुली आणि एका मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. देवीचंद ब्राम्हणे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे हत्या केल्याचा संशय वर्तवला जातो आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील देवीचंद ब्राम्हणे हा उच्चशिक्षित आहे. 15 वर्षांपूर्वी संगीता हिच्या बरोबर देवीचंदचा विवाह झाला. 14 वर्षीय मुलगी निशा, 12 वर्षीय नेहा आणि 6 वर्षीय हर्ष असं देवीचंदचं कुटुंब होतं. गेल्या अनेक वर्षांपासून सुखाने नांदंत असताना काल मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी देवीचंद ब्राम्हणे याने आपल्या पत्नीसह दोन मुली व एका मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.

स्वत: आरोपीने सकाळी लोणी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी गेल्या 4 वर्षांपासून आजारी असल्याचं यावेळी समोर आले असून कुटुंबात कोणताही वाद नव्हता, असे आरोपीचे वडील हिराचंद ब्राम्हणे यांनी सांगितले. शिवाय, देवीचंद हा मनोरुग्ण असल्याने ही घटना घडल्याचा संशयही आरोपीचे वडील हिराचंद ब्राम्हणे यांनी व्यक्त केला आहे.

आमच्या मेव्हण्याने हे केलं नसावं, असं मत मयत संगीताच्या भावाने व्यक्त केलं आहे. शिवाय, “ मुलांना काटा जरी टोचला तरी आरोपी सगळ्यांची काळजी घेत होता. आपल्या मुलांना त्रास होऊ नये, यासाठी आरोपीने एवढं शिकूनही नोकरी केली नाही”, असा दावा मयत संगीताच्या भावाने केला आहे. त्यामुळे घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, ही घटना नैराश्यातून घडली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.