Congress On Kirit Somaiya : किरीट सोमय्या हे नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू इच्छित असल्याचे बोचरी टीका काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. या जखमेबाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. 


भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वादात काँग्रेसने  उडी घेतली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करून सोमय्यांवर टीका केली आहे. डॉक्टरांनुसार 0.5 cm x 0.1 cm x 0.1 cm चा ठिपका चेहेऱ्यावर आला. तो आणला गेला का? हे चौकशीअंती स्पष्ट होईलच पण २ दिवसांत बँडेज गायब झाले तसा आता तो दिसेनासाही झाला. या नौटंकीने महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होत असल्याचे सावंत यांनी म्हटले. 






मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. शनिवारी, मुंबई पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केली होती. त्यांना भेटण्यासाठी सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी आपल्यावर शिवसैनिकांनी दगडफेक करत हल्ला केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर राज्यात राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. 


सोमय्यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळाची भेट


किरीट सोमय्यांच्या नेतृत्वातील भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गुंड मारहाण करतात, ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले. पांडेंनी घटनेचे cctv फुटेज गायब केले, त्यांची खात्यांतर्गत चौकशी करा अशी मागणी केली सोमय्यांनी केली. 


राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्रित लावा : संजय राऊत


शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.  गेल्या दोन वर्षात केंद्रीय गृहसचिवांना भाजपचं शिष्टमंडळ 7 वेळा भेटून आलं. आता कुणालातरी ओठाखाली रक्त आलं आहे, त्यासाठी राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत आहेत. यांना काही ना काम ना धंदा, अशा शब्दात  राऊतांनी हल्लाबोल केला आहे.  


राऊत यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशात सरकार आल्यापासून मागील 3 महिन्यात 17 बलात्कार झाले. तिथे लावता का राष्ट्रपती राजवट? महाराष्ट्रात या लोकांना कामधंदा नाही. तुमचे काही प्रश्न असतील कायदा आणि सुव्यवस्थासंदर्भात तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटीला हवं.  


संजय राऊत म्हणाले की, दोन-चार लोकं जातात. दिल्लीला उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात.  महाराष्ट्राच्या बदनामीचे हे षडयंत्र आहे, आणि हे षडयंत्र असंच सुरु राहिलं तर ह्या महाराष्ट्रद्रोह्यांना लोकं जागेजागी चपला मारतील, असं ते म्हणाले.