Accident News : गुजरात राज्यातील नवसारी येथील मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वेस्मा गावा नजीक कार व पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात महाराष्ट्रातील मजूर जखमी झाले आहेत. नवापुर तालुक्यातील दुधवे येथील मजूर नवसारी जिल्ह्यातील हांसापूरहून सुरत जिल्ह्यातील ओलापाड येथे भात कापणीसाठी जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली. 


कार क्रमांक GJ-15 CJ 9492 चा टायर फुटल्याने कार महामार्गावर पलटी झाली. या कारच्या मागे असणारी मजुरांनी भरलेली पिकअप वाहन (क्रमांक GJ-19 X-1063) कारवर जोरदार आदळली. पिकअप टेम्पो देखील रस्त्यावर पलटी झाला. यातील 17 मजूर रस्त्यावर जोरदार फेकले गेले. यामध्ये महिला व लहान बालकांसह मजूर जखमी झाले आहेत. कारमधील दोन प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच स्थानिक नागरीक मदतीसाठी धावून आले. 


अपघातात जखमी झालेल्या मजुरांना तातडीने इतर वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवापूर तालुक्यातील दुधवे व मेनतलाव गावातील मजूर गुजरात राज्यात मजुरीसाठी कामाला गेले होते. नवसारीहून सुरतकडे जात असताना रविवारी संध्याकाळी अपघात झाला. यात 17 मजुर जखमी झाले आहेत. राजू जेया वसावे, निलिमा सुरेश वसावे, अमिरा वनकर वळवी, कालमा सुभाष वसावे, राजू वळवी या मजुरांना गंभीर दुखापत झाली आहे. जीवन मेथ्या वसावे, सुनिल जालमसिंग वसावे, वाडगी दिनकर वसावे, सुहानी शैलेश वसावे, सुरेश वसावे या मजुरांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नवसारी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात दरम्यान काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. नवसारी सरकारी रुग्णालयात जखमी मजुरांवर उपचार सुरू आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha