जालना : जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना जालना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सॉफ्टवेअरमधील डेटा एन्ट्रीचं प्रलंबित बिल देण्यासाठी एकूण रकमेच्या 15 टक्के रक्कम म्हणजेच 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
खासगी कंत्राटदाराने एजन्सीमार्फत जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकसंख्या वहीमधील माहिती राष्ट्रीय माहिती केंद्र एनआयसीच्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा एन्ट्रीचे कंत्राट घेतले होते. या कामाचे देयक मिळवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला.
आरोपी इतवारे यांनी बजेट नसल्याचं कारण पुढे करत 30 लाखांचा धनादेश देण्यासाठी 15 % प्रमाणे 4 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्याने इतवारे यांनी 10 लाखांचा चेक देतो, ते कॅश करुन माझ्या ठरलेल्या टक्क्यांप्रमाणे पैसे द्या. नंतर मी तुमचे उर्वरित बिल मंजुर करतो, असं सांगितलं. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जाऊन पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी 4 लाख 50 हजार रुपयांची मागणी करुन तडजोड अंती 3 लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाले आणि मध्यस्थ अहमद शेख याला बोलावून तक्रारदाराला लाचेची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगितले.
दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया व परवानगी घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे व अतिक शेख या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली असून, लाच मागितल्या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.