यवतमाळ : आजही अनेकांचा वंशाला दिवा, संपत्तीला वारस म्हणून मुलगा हवा असा आग्रह असतो. मुलीचा जन्म झाला तर नाक मुरडणं अजूनही आहेच. मात्र एबीपी माझाचे यवतमाळचे प्रतिनिधी कपिल श्यामकुंवर याला अपवाद ठरले आहेत. श्यामकुंवर कुटुंबात नुकतंच आगमन झालेल्या चिमुकलीचं त्यांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. वाजतगाजत, फुलांची उधळण करत लाडक्या लेकीचा गृहप्रवेश झाला.


कपिल श्यामकुंवर हे एबीपी माझाचे यवतमाळचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी 7 जानेवारी रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माने श्यामकुंवर कुटुंबातील आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यानंतर शुक्रवारी म्हणजे 10 जानेवारीला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र मुलीचं स्वागत अनोखं व्हावं यासाठी कपिल श्यामकुंवर यांनी जय्यत तयारी केली होती.

घरी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा संदेश रांगोळीतून देण्यात आला होता. घरात फुलं आणि फुग्यांनी सजावट करण्यात आली होती. रुग्णालयातून बाळ आणि बाळंतीण घरी आली त्यावेळी तुतारी, ढोल-ताशाचं पथक आणि गुलाबाच्या पाकळ्यांचं रेड कार्पेट स्वागतासाठी सज्ज होतं. तर जमलेल्या गोतावळ्याचं जिलेबीऐवजी केक भरवून तोंड गोड केलं.

समाजात आजही मुलगी नको, मुलगा हवा, हा अट्टाहास पाहायला मिळतो. मात्र कपिल श्यामकुंवर यांनी लाडक्या कन्येचं अनोख्या पद्धतीने स्वागत करन नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या लेकीचा कौतुकसोहळा पाहण्यासाठी शेजारीपाजारी उपस्थित होते.

दरम्यान, मुलगी आणि मुलगा यात कोणताही भेद नाही. मुलगी प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आम्हाला आराध्य नावाचा पहिला मुलगा आहे. आता मुलीच्या जन्माने कुटुंब पूर्ण झालं आहे, अशी प्रतिक्रिया मुलीची आई गीतांजली श्याुमकुंवर यांनी दिली.