मुंबई : एबीपी माझाने गणेशोत्सवाचे उत्सवी स्वरुप न ठेवता या कोरोना काळात उत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या दहा मंडळांना माझा विघ्नहर्ता पुरस्कार देऊन आज सन्मानित केलं. या दहा मंडळामध्ये कोल्हापूरच्या एकजूट गणेश मंडळ, औरंगाबादच्या संस्थान गणपती, पुण्याच्या भाऊरंगारी गणेशोत्सव मंडळ, नागपूरच्या संती गणेशोत्सव मंडळ, ठाण्याच्या जय हनुमान बाल मित्र मंडळ, नाशिकच्या रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, सोलापूरच्या सुवर्णयोग मित्र मंडळ, मुंबईच्या पार्लेस्वर गणेशोत्सव मंडळ, मुंबईच्या चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळ, लालबागचा राजाचा समावेश आहे.
कोल्हापूर – एकजूट गणेश मंडळ
कोल्हापूर शहरातील एकजूट गणेश मंडळानं कोरोनाच्या संकटात समाजभान जपत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी 25 बेडचं कोविड सेंटर उभं केलं. कोविड सेंटर उभं करणारं ते पहिलं गणेश मंडळ आहे. त्याच बरोबर लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरोघरी जाऊ धान्याचे वाटप केले. आणि असे अनेक उपक्रम या मंडळीने राबवले. त्यासाठी त्यांना माझाच्या विन्घहर्ता पुरस्कारानं गौरवण्यात येतंय.
औरंगाबाद – संस्थान गणपती
औरंगाबादच्या संस्थान गणपती मंडळानं साधेपणानं उत्सव साजरा करण्याचं ठरवलं. गरजूंसाठी आरोग्य शिबीर. रक्तदान शिबीर यासह अन्य सामाजिक उपक्रम राबवत यावर्षी गणेश उत्सव साजरा केला आहे.
पुणे - भाऊरंगारी गणेशोत्सव मंडळ
पुण्यातील भाऊरंगारी गणेशोत्सव मंडळ अनेकांसाठी विघ्नहर्ता बनलं. या गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी केलेलं काम फार मोलाचं आहे..त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवले, गरजूंना जेवण देण्याचं सर्वात मोठं काम या मंडळानं हाती घेतलं होतं.
नागपूर- संती गणेशोत्सव मंडळ
गेल्या 63 वर्षांपासून यी मंडळाला त्यांच्या दिमाखदार गणेशोत्सवाकरिता ओळखलं जातं. या मंडळानं सादर केलेला देखावा पाहण्यासाठी रोज हजारो भाविक या मंडळाला भेट द्यायचे. यावर्षी मंडळाने कोरोनामुळे कोणताही देखावा साकारलेला नाही. देखावा आणि सजावटी ऐवजी मंडळाने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, औषधांचे वाटप असे कार्यक्रम घेत गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने आरोग्य उत्सव बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाणे - जय हनुमान बाल मित्र मंडळ
जय हनुमान बाल मित्र मंडल, ज्याने फळे, फुले, प्रसाद याऐवजी भक्तांना शहाळे आणण्यासाठी प्रोत्साहित केले. आणि ही शेकडो शहाळी त्यांनी कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन वाटली. गणपतीसाठी जमा झालेले धान्य 500 कुटुंबांना वाटले.
नाशिक - रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ
नाशिककरांचे श्रद्धास्थान आणि नाशिकचा मानाचा गणपती म्हणुन ओळखला जाणारा रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचा चांदीचा गणपती, गणेशोत्सवाच्या 103 वर्षाच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव शांततेत आणि साधेपणाने साजरा करीत आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा ब्रिटिशांच्या राजवटीत अशी वेळ आली नव्हती. यावर्षी कोरोनाच्या महामारीच्या काळात शासनाच्या निर्णयाचे पालन करुन आणि गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सव साधेपणाने आणि आरोग्य उत्सव म्हणून साजरा केला. परंतु गणेश स्थापनामध्ये खंड पडू नये म्हणून पुजेसाठी परंपरेनुसार शाडू मातीची आॅरगनिक गणेश मूर्तीची स्थापना मंदिरातच करण्यात आली. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली.
सोलापूर- सुवर्णयोग मित्र मंडळ
मागील 15 वर्षांपासून सोलापुरातील सुवर्णयोग मित्र मंडळ अविरतपणे सामाजिक कार्य करत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक विडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांचे मोठे हाल झाले. त्यांना मंडळातर्फे मोफत अन्नदान वाटप करण्यात आलं. तसंस अन्य आरोग्य शिबिरं या मंडळातर्फे राबवण्यात आली आहे.
मुंबई – पार्लेस्वर गणेशोत्सव मंडळ
मुंबईतील पार्लेश्वर गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात रक्तदान शिबिर तर राबवलच शिवाय यंदा टाळेबंदीत या मंडळाने कौतुकास्पद काम केलं आहे. यामध्ये स्वयंसेवक बनून जेष्ठ नागरिकांना किराणा पोहचवणे, मुंबईतील स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचार्यांना पीपीई किटच वाटप करणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्यां आव्हाना नंतर रक्तदान शिबिर राबवणं, मुंबईतील रिक्षा चालकांना मोफत सोशल डिस्टन्स पाळता यावं यासाठी प्लास्टिक कव्हर लावून देणं, पोलीस बांधवाना नाश्ता, गरजेची औषधं, मास्क पोहचवणे अशी अनेक कामं मंडळाने केली आहेत.
मुंबई – चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळ
चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळानेही छोटी मूर्ती बसवत आरोग्योत्सव साजरा केला. त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केलं. तसंच गरजूंना मोठ्या प्रमाणात मदतही केली.
लालबागचा राजा
लालबागचा राजा मंडळाने त्यांनी यावेळी मूर्ती न बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत आगोर्योत्सव साजरा केला त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. प्लाझ्मा दानही मोठ्या प्रमाणात झालं.