मुंबई: स्वातंत्र्यानंतर लोक सुखी होतील, शेतकरी समाधानी होतील असं वाटलं, पण आज त्यातलं काहीच झालं नाही. आजच्या काळात सर्वात जास्त खटकत असेल तर ती जात, आणि ही जात संपायला हवी अशी इच्छा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. 


दत्ता गांधी म्हणाले की, "आता सर्वात जास्त खटकतंय ती जात. आज सर्व निवडणुकीमध्ये जातीच्या आणि धर्माच्या आधारावर सुरू आहे. हे कुठेतरी संपायला हवं असं दत्ता गांधी यांनी सांगितलं. या काळातही आपली तब्बेत ठणठणीत कशी असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नित्याचा व्यायाम आणि कमी अन्न सेवन कमी करणं हे सूत्र आजही मी पाळतो."


शिक्षक कसं झालो?
1945 साली अच्युतराव पटवर्धन यांनी माझा मॅट्रिकचा निकाल पाहिला आणि त्यानंतर मला कुलाबा जिल्ह्यात सेवा दलाचं काम करण्यासाठी धाडलं. त्यानंतर एस एम जोशी यांनी मुंबईत बोलावलं. त्यांनी शिक्षक व्हायला सांगितलं आणि मी शिक्षक झालो अशी आठवण दत्ता गांधी यांनी सांगितली. 


लग्नाची गोष्ट
दत्ता गांधी लग्नाबद्दल आठवणी सांगताना म्हणाले की, "1950 साली सांगलीमध्ये शिबिर झालं, त्यावेळी पत्नी आशा यांची पहिली भेट झाली. पत्नीचं पूर्वीचं नाव किशोरी पुरंदरे. त्यानंतर भेटी वाढल्या. त्यावेळी माझं दुसऱ्याच मुलीवर प्रेम होतं. पण सेवा दलाशी संबंधित असलेल्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणं हेच योग्य वाटलं. त्यामुळे किशोरी हिच्याशी लग्न केलं. लग्नामध्येही केवळ 268 रुपये खर्च आला."


आम्ही 'चले जाव'च्या आंदोलनात भाग घेतल्यानंतरही गांधीजींची अहिंसेची भूमिका पूर्णपणे स्वीकारली नाही. पण सुभाषबाबूंनी जपानची मदत घेतली, त्या विरोधात जवाहरलाल नेहरुंनी भूमिका घेतली, नेहरुंची भूमिका आम्ही स्वीकारली. पण तरीही सुभाषबाबूंचे आम्हाला कौतुक वाटतं. आताची परिस्थिती पाहून वाटतं की कधीतरी निर्णायकी काळ येतो, तरुण जागे होतील आणि हे सर्व बदलून जाईल असं वाटतंय.


साने गुरुजींचं एक स्वप्न होतं, एक आंतरभारती प्रबोधिनी शाळा उभी राहावी. त्या ठिकाणी तरुणांचे प्रशिक्षण व्हावं असा आशावादही दत्ता गांधी यांनी व्यक्त केला.


नेहरु असताना काहीतरी घडतंय असं वाटायचं
दत्ता गांधी म्हणाले की, "स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदू-मुस्लीममांध्ये दंगली सुरू होत्या. त्यावेळी हे स्वातंत्र्य तुटक होतं असं वाटलं. उरण या ठिकाणी आम्ही स्वातंत्र्याच्या दिवशी झेंडा फडकावला. स्वातंत्र्यानंतर लोक सुखी होतील, शेतकरी समाधानी होतील असं वाटलं. पण आज त्यातलं काहीच झालं नाही. जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना देशात काहीतरी होतंय, काहीतरी घडतंय असं वाटायचं. पण त्यानंतरची पुढची वर्षे काँग्रेसमध्ये तशा प्रकारचं काम झालं नाही. नेहरुंच्या काळात अनेक नेते हे अगदी साधेपणाने जगत होती. आज त्यामध्ये बदल झाला असून सर्व अपेक्षाभंग झाल्याचं वाटतंय."