Majha Katta: उद्धव ठाकरेंनी राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं, पण त्यांनी तसा निर्णय का घेतला हे माहिती नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले. विश्वासदर्शन ठरावाला सामोरं जाणं हे अपेक्षित होतं असंही ते म्हणाले. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी अनेक प्रश्नावर संवाद साधला.
यावर सर्वोच्च न्यायालयच निर्णय देईल...
अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटाच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केलं अशी तक्रार करत सुनिल प्रभूंनी आक्षेप घेतला होता. सुनिल प्रभुंचा व्हिपसंबंधी अर्ज नरहरी झिरवळ यांनी पटलावर घेतला होता, त्यानंतर राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यानंतर भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांच्या विरोधात व्हिपचं उल्लंघन केल्याचं सांगितल. यावर कोणता व्हिप योग्य आहे असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारला असता याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयात मिळेल असं ते म्हणाले. सध्यातरी विधानसभा अध्यक्षांच्या कामावर न्यायालयाने कोणताही आक्षेप घेतला नाही असंही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवलं तर निश्चितपणे त्यांना अपात्र केलं जाईल. बहुमत असेल तर सरकार टिकेल आणि नसेल तर ते टिकणार नाहीत. कोणत्याही आमदाराला निलंबित करावी अशी माझी इच्छा नाही, पण जर परिस्थिती तशी आलीच तर निर्णय घ्यावा लागेल असं राहुल नार्वेकर म्हणाले.
राज्यपाल असतील वा इतर सर्वोच्च न्यायालय असेल, या संविधानिक संस्था आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात वक्तव्य करणं अपेक्षित नाही. तसं असेल तर न्यायालयात जाऊन त्या विरोधात दाद मागता येते असं राहुल नार्वेकर म्हणाले.
आमदारांना घाईगडबडीत अपात्रतेची नोटिस
आमदारांना अपात्रतेची नोटिस देताना त्यांना त्यांचं मत मागण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाते. पण नरहरी झिरवळ यांनी तसं न करता दोन दिवसांची मुदत देत नोटिस दिली, ती प्रक्रियेप्रमाणे नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले. या प्रकरणात घाईगडबड करण्यात आल्याचं ते म्हणाले.
नरहरी झिरवळ यांना अध्यक्षपदाचे अधिकार द्या आणि निर्णय घेऊ द्या असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून करण्यात आला. या युक्तीवादाशी आपण सहमत नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले. ज्यावेळी अध्यक्ष उपस्थित असताना उपाध्यक्षांकडे असे अधिकार देऊ शकत नसल्याचं ते म्हणाले. दुसरं म्हणजे ते उपाध्यक्ष असताना त्यांच्याकडे काही निवेदनं आली, याचिका आणि अर्ज आले, तर त्यांनीच त्यावर निर्णय घ्यावा हे योग्य नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले.
आमदार निवडून येतात ते पक्षाच्या चिन्हावर, ते अनेक लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. पण एखादा पक्षाध्यक्षच जर चुकीचा निर्णय घेत असेल किंवा त्या आमदारांला पक्षाध्यक्षाचा निर्णय मान्य नसेल तर त्याला तसा अधिकार असावा. सभागृहाच्या आतलं कामकाज हे विधीमंडळाच्या गटाला द्यावं लागतं असं राहुल नार्वेकर म्हणाले.