शहापूर : तालुक्यातील हाली बरफ या महिलेच्या आयुष्यात शौर्य पुरस्कार पटकाविल्यानंतरही अठराविश्व दारिद्र्य आणि अंधार काही संपला नव्हता. लॉकडाऊनमुळे हंगामी स्वरूपात आश्रमशाळेत नोकरी मिळालेली, पण आश्रमशाळा बंद असल्याने तीही गेली. तर शिधावाटप पत्रिकेची ऑनलाईन नोंद नसल्याने तीन महिने धान्य सुध्दा न मिळाल्याने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफवर उपासमारीची वेळ आली.


काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची व्यथा मांडणारं वृत्त एबीपी माझानं प्रसारित केलं होतं. एबीपी माझाच्या या बातमीची दखल घेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी तहसीलदार कार्यालय शहापूर येथे तीन महिन्यांच्या हंगामी शिपाई पदावर हाली बरफची नियुक्ती केली आहे. नुकतंच नियुक्तीपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला. त्यासोबतच पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तिच्या शिधा पत्रिकेची ऑनलाईन नोंदणी होत नाही तोपर्यंत तिला ऑफलाईन धान्य देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिले आहेत.


कातकरी या आदिम आदिवासी जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजातील हाली बरफ हिने 12 वर्षांची असताना आपल्या मोठ्या बहिणीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. जंगलात लाकूडफाटा घेण्यासाठी गेली असता वाघाने केलेल्या हल्ल्यातून आपल्या बहिणीचे प्राण तिने वाचविले होते. त्यासाठी तिचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर 2012मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन करण्यात आला होता. परंतु त्यानंतर अशिक्षित असलेल्या हालीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी सतत दुर्लक्ष केल्याने तिला आपल्या आयुष्यासाठी झगडावे लागले. त्यातून तिला अंत्योदय शिधापत्रिका, घरकुल देण्यात आले. तर उदरनिर्वाहासाठी आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिपाई पदावर हंगामी नेमणूक करून तिला मदत केली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये आश्रमशाळा मागील एक वर्षांपासून बंद असल्याने तेथील नोकरी तिने गमावली होती. त्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा दारिद्र्याचं संकट ओढावलं होतं. यावर उपाय म्हणूनही तीन महिन्यांची हंगामी नोकरी तिला उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने हाली बरफ हिने समाधान व्यक्त केले आहे.


समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणं हे शासनाचे कर्तव्य असून हाली बरफ हिच्या वाट्याला आलेल्या संकटाची माहिती कळताच आपण तिला हंगामी नोकरी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सरकारी नोकरी, पुरेसं अन्न फक्त आश्वासनांपुरतंच; राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफवर लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ