मुंबई : ग्रंथालयं सुरु करा म्हणून एबीपी माझानं सुरु केलेल्या मोहिमेला यश मिळालं आहे. लॉकडाऊनंतर ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या विश्वस्तांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीसंदर्भात राज ठाकरे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचित केली. यावेळी ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना सांगितलं आहे.


ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात एबीपी माझाने जे प्रश्न उपस्थित केले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारनं दिली आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या विश्वस्तांनी भेट घेतली. सर्व विश्वस्तांनी आपली बाजू मांडली. तसेच त्यांचं म्हणणं आणि अडचणीही सांगितल्या. या सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर राज ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर उदय सामंत यांनी आठवडाभरात ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असं सांगितलं आहे.



ग्रंथालयांसदर्भात नोटीफिकेशबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, 'ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात मी पुण्याच्या दौऱ्यावर असताना ग्रंथालयांतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की, आम्ही यासंदर्भातील प्रस्ताव मुख्य सचिवांकडे दिलेला आहे. तसेच ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात प्रक्रीया सुरु आहे. त्यावेळी मी सांगितलं होतं की, येत्या आठ दिवसांमध्ये ग्रंथालयं सुरु होतील.' पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'ग्रंथालयं दोन दिवसांतच सुरु करू शकतो हे मलादेखील मान्य आहे. पण जर दोन दिवसांत सुरु झाली नाही, तर पुन्हा मलाच प्रश्न विचारले जाणार, म्हणून आठवडाभराचा अवधी लागेल. तसेच यासंदर्भातील प्रस्ताव आधीच मुख्य सचिवांकडे गेलेला आहे. त्यामुळे आठ दिवसांची जरी मुदत मागितली असली तरी लवकरात लवकर ग्रंथालयं सुरु होतील.'


पाहा व्हिडीओ : वेगवेगळ्या ग्रंथालयाचे विश्वस्त राज ठाकरे यांच्या भेटीला



ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भातील गाईडलाइन्ससंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, 'ग्रंथालयं सुरु केल्यावर ग्रंथालयात वावरताना मास्कचा वापर करणं आपल्या सर्वांना बंधनकारक असणार आहे. सॅनिटायझिंगची व्यवस्थाही ग्रंथालयांमध्ये करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करावं लागणार आहे. कोविडसाठी जे काही प्रोटोकॉल्स देण्यात आले आहेत. त्या सर्वांचं पालन करूनच आपल्याला ग्रंथालयं सुरु करावी लागणार आहेत.'


लॉकडाऊनमुळे ग्रंथालयांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात शासन काही विचार करत आहे का? यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, 'ग्रंथालयांच्या बाबतीत ग्रंथालय संघटनांची पूर्वीपासून मागणी होती की, त्यांचं अनुदान वाढवावं. त्यांच्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने न्याय द्यावा. यासाठी एक कमिटी स्थापन केली होती आणि अधिवेशनात या कमिटीचा अहवाल सादर केला जाणार होता. परंतु, कोविडमुळे तसं होऊ शकलं नाही. पण त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळे सकारात्मक आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ग्रंथालयांना आर्थिक मदतीची. काही दिवसांपूर्वी ग्रंथालयांना मंजूर झालेले 30 कोटी रूपये थकीत होते. ते सुद्धा त्यांना देण्यात आले आहेत.'


ग्रंथालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही वेगळ्या नियमावलीसंदर्भात बोलताना उदय सामंत यांनी सांगितलं की, 'त्यासाठी आम्ही आठवडाभराचा कालावधी घेतला आहे. कारण ग्रंथालयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वचजण येतात. त्यामुळे यासाठी काही नियमावली तयार करावी लागेल. त्यामुळे थोडा कालावधी लागले. पण ग्रंथालयं सुरु करण्याचा निर्णय झालेला आहे.'