ABP C Voter Survey On Maharashtra Government: महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणत गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यमयी घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एवढंच नाहीतर अनेक तर्क-वितर्कांनी जोर धरला आहे. असं म्हटलं जात आहे की, महाराष्ट्रात लवकरच अनेक बदल घडणार आहेत. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुट्टी होणार असल्याच्याही चर्चा जोरात सुरू आहेत. तर त्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. 


राज्याच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री पदावरुन दावे-प्रतिदावे सुरू आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री असं म्हणत आपल्या नेत्यांचे पोस्टर्स झळकावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री म्हणत वेगवेगळ्या जिल्ह्यात पोस्टर्स झळकावले जात आहेत. तर नागपुरातही भाजप कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकावण्यात आले आहेत. 


अशातच या सर्व घडामोडींमध्ये एक प्रश्न उद्भवतोय की, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले तर काय होणार? काय नवी राजकीय समीकरणं (Maharashtra Politics) पाहायला मिळू शकतात...? पाहुयात सविस्तर... 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार झाले तर, काय समीकरणं? 



  • भाजप-ठाकरे गट एकत्र येऊ शकतात : 19 टक्के 

  • भाजप-राष्ट्रवादी हातमिळवणी करणार : 12 टक्के 

  • महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार : 19 टक्के 

  • मध्यावधी निवडणूक : 32 टक्के

  • माहीत नाही : 18 टक्के


एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणात 19 टक्के लोकांनी भाजपनं उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करावी, असं म्हटलं आहे. म्हणजेच राजकीय वैर विसरून जुन्या मित्रांनी नवी सुरुवात करावी. तर 12 टक्के लोकांनी भाजप आणि शरद पवार यांच्या पक्षानं एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, असं म्हटलं आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पुन्हा सरकार स्थापन करावं, अशी 19 टक्के लोकांना इच्छा आहे. विशेष म्हणजे, जनतेचा खरा कौल कळावा यासाठी निवडणुकीचा पर्याय चांगला असेल, असं जास्तीत जास्त 32 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तर 18 टक्के लोकांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागल्यास महाराष्ट्रात काय होईल हेच कळत नाही.


सोमवार ते बुधवार सर्वेक्षण


सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे. जलद राजकीय प्रश्नांवर अखिल भारतीय सर्वेक्षण सोमवार (24 एप्रिल) ते बुधवार (26 एप्रिल) या कालावधीत करण्यात आलं आहे. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.