Ashish Asore Pune: पुण्यातील प्रयोगशील चित्रकार 25 वर्षीय अभिषेक असोरे याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सरळ रेषेचे तंत्र वापरून सर्वात मोठे चित्र काढण्याचा विक्रम करून पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सरळ रेषा पोर्ट्रेट, तैलचित्र, ऍक्रेलिक पेंटिंग, वॉल म्युरल, व्यंगचित्र, डिजिटल पेंटिंग, लँडस्केप या सगळ्या प्रकरात तो उत्तम चित्र काढतो. पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या अभिषेकचं या रेकॉर्डमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.



अभिषेक असोरे याने अभिनव महाविद्यालयातून कमर्शियल आर्टचं शिक्षण घेतलं आहे. मात्र त्याला कमर्शियल आर्टमध्ये फार रुची नसल्याने शिक्षण संपल्यानंतर त्याने पेंटीग करायला सुरुवात केली. त्याचा मोठा भाऊसुद्धा उत्तम चित्रकार आहे. मोठ्या भावाची प्रेरणा घेत त्यांने आतपर्यंत अनेक चित्र रेखाटले आहे. मात्र सरळ रेषा पोर्ट्रेटमध्ये त्याची विशेष आवड असल्याने त्याने या प्रकारात वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. सरळ रेषा पोर्ट्रेट या प्रकारात 3 MM ची पेन वापरुन सरळ रेषेत एखादी प्रतिकृती निर्माण करणं फार अवघड असतं. मेहनतीने या प्रकारात आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केला आहे.


घरातील परिस्थिती हलाखीची 
अभिषेक असोरे हा पुण्यातील कात्रज परिसरात राहतो. लहाणपणापासून त्याला चित्रकलेची आवड होती. त्याची आई गृहीणी आहे तर वडित पुण्यात रिक्षा चालवतात. एकाचीच कमाई असल्याने घरातील परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे लहानपणापासून अभिषेकला गरिबीचा सामना करावा लागला. 


1 महिन्याच्या परिश्रमाचं फळ मिळालं
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेलं चित्र पुर्ण करण्यासाठी सलग एक महिना  मेहनत घेत होता. मयूर कॉलनीतील सोलारिज् हेल्थ क्लबच्या जयंत पवार यांनी अभिषेकची ही कलाकृती पाहिली. त्यानंतर त्यांनी स्वत: मेहनत घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी अर्ज केला. अभिषेकची ही कलाकृती इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठवण्यात आली आहे, याची अभिषेकला काहीच कल्पना नव्हती. ज्यावेळी त्याच्या नावाने हा रेकॉर्ड झाला त्यानंतर त्याला ही आनंदाची बातमी जयंत पवार यांनी सांगितली. माझी मेहनत तर आहेच मात्र जयंत सरांचा मी कायम ऋणी असेल, असं अभिषेकने एबीपी माझासोबत बोलताना सांगितले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय प्रवासाचं चित्रदेखील त्याने रेखाटलं आहे. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, गुरुजी तालीम गणपती, स्वामी समर्थ, ज्येष्ठ नेते शरद पवार,  सुप्रिया सुळे, जयंत पवार, मुरलीधर मोहोळ, अमिताभ गुप्ता यांची विविध प्रकारची चित्रे त्याने रेखाटली.