धुळे : धुळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करु, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (26 ऑगस्ट) धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं वाहन अडवलं. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट नाकारल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बैठकीसाठी येत असलेल्या अब्दुल सत्तार यांचं वाहन जिल्हा परिषद कार्यालयासमोर अडवलं. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पालकमंत्र्यांच्या वाहनासमोरुन हटवून वाहनाचा रस्ता मोकळा केला.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत धुळे पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार राम सातपुते यांनी केली होती. तर हा लाठीचार्ज अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरुनच करण्यात आल्याचा आरोप अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी केला आहे. यानंतर पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करु, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या काय होत्या?
कोरोनाचा फटका शैक्षणिक वर्तुळाला बसला आहे. राज्यात परीक्षेसंदर्भात देखील मोठा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थींना झालेल्या नुकसानीची जबाबदारी घेऊन, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली होत. यासोबतच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या एकूण शुल्कापैकी 30 टक्के शुल्क सरसकट माफ करावे. तसंच
मार्च ते जून महिन्यातील वसतिगृह, खानावळ शुल्क, बस शुल्क शंभर टक्के परत करावेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत 10 टक्के प्रवेश शुल्क घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरु करावी आणि उर्वरीत शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे, अशा विविध मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या केल्या होत्या.
दरम्यान आंदोलन करणाऱ्यांपैकी सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.
ABVP Protest | अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी अब्दुल सत्तारांची गाडी अडवली