नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात ला निकाल अजून आलेला नसला तरी त्या आधीच या प्रकरणावरून काँग्रेस विरुद्ध भाजप असे आरोप रंगत आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या विनायक मेटेवर काँग्रेसने आज सनसनाटी आरोप केला आहे. विनायक मेटे यांच्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर नसतं बालंट ओढवलं असतं. पण कोर्टाने त्यांची याचिका ऐकूनच न घेतल्यामुळे ते थोडक्यात वाचलं असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या आजच्या सुनावणीत विनायक मेटे यांच्यावतीने 102 व्या घटना दुरुस्ती ला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका ऐकून घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार दिला. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला 102 व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानिक दर्जा मिळाला.प्रकरण घटनात्मक खंडपीठाकडे जावं यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता पण त्यामुळे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता होती.मराठा आरक्षणाबाबत निर्णय देताना हायकोर्टाने राज्य मागासवर्गीय आयोगाचा अधिकार मान्य केला होता.
त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, 102 व्या घटना दुरूस्तीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात पुरेसा उहापोह झाला आहे. यावरून घेण्यात आलेले आक्षेप नाकारून उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवले आहे. या पार्श्वभूमिवर मेटे यांनी या विषयावर याचिका दाखल करून ती मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी जोडण्याची मागणी म्हणजे मराठा आरक्षणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.
मागील तीन दिवस आ. विनायक मेटे नवी दिल्लीत आहेत. त्यांनी नेमक्या कोणाच्या इशाऱ्यावरून आणि कोणत्या हेतूने मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेतली, ते स्पष्ट केले पाहिजे. केवळ श्रेयवादासाठी ते हे उद्योग करत असतील तर त्यांनी आपली कोणती कृती आरक्षणाला पोषक ठरेल आणि कोणती मारक ठरेल, याचा सारासार विचार करावा, असेही सचिन सावंत यांनी म्हणाले. यावर एबीपी माझाने विनायक मेटे यांच्याशीही ही संपर्क साधला मात्र त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळाली नाही.
संबंधित बातम्या :