मुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज विधान भवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांचे फोटोसेशन (Maharashtra All Party Photo session) झालं. पण फोटोसेशनवेळी एक चर्चा मात्र जोरदार होती. या फोटोसेशनला आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) हे मात्र उपस्थित नव्हते. त्यावर आता त्यांनी खुलासा दिला आहे. पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते, कुठे उभं राहायचं म्हणून मी आलो नाही, तर माझं मुळात मन नव्हतं म्हणून मी आजच्या फोटोशेनला आलो नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले


फोटोसेशनमध्ये सहभागी व्हायला माझं मन नव्हतं. मी आधीच्या फोटोसेशन मध्ये सहभागी झालो होतो. पण येथे घटनाबाह्य सरकार निर्माण झालं आहे, त्या सरकार मध्ये फोटोसेशन करण्याचा माझं मन नव्हतं. समोरच्या रांगेत सगळे घटनाबाह्य सरकार मधील मंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मागच्या रांगेत उभा होतो. कुठे उभं राहायचं म्हणून मी आलो नाही, तर माझं मुळात मन नव्हतं म्हणून मी आजच्या फोटोशेनला आलो नाही.


कोस्टल रोडला टोल लागणार, यांना एखादा कॉन्ट्रॅक्टर दिसला असेल


आदित्य ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाची चर्चा सुरू असताना विधान भवनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत. एकीकडे आमदार बोलत आहेत, पण मुख्यमंत्री अनुपस्थितीत आहेत. दुसरीकडे कोस्टल रोडला आता हे सरकार टोल लावायचा विचार करतंय. यांना कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर दिसला असेल. 


निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरतंय


सिनेटची निवडणूक घेत नाही, ना लोकसभेची निवडणूक घेत आहेत, हे सरकार निवडणुकील घाबरतंय अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, या सरकारने महाराष्ट्रामध्ये लोकतंत्र मोडीत काढलं आहे. चंद्रपूर, पुणे लोकसभा निवडणुका झाल्या नाहीत. इलेक्शन कमिशन निवडणूक घ्यायला तयार नाही. कुठलीच निवडणूक घ्यायला सरकार आणि निवडणूक आयोग तयार दिसत नाही.


राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यामध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, याबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही. याची माहिती घेऊन सांगतो.