Aaditya Thackeray : ज्या पद्धतीने शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आलं त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा अजित पवार यांच्याकडे बहाल करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांमधून आता संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाविकास आघाडीमधील सर्वच नेत्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात सडकून प्रहार केला आहे.
जेव्हा निवडणूक आयोगानेच चोरीला वैध ठरवायला सुरुवात केली
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निवडणूक आयोगावर या सडकून प्रहार केला आहे. इलेक्शन कमिशन खरोखर 'स्वतंत्र आणि निष्पक्ष' आहे का? पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की, EC म्हणजे 'Entirely Compromised'! तडजोड बहाद्दर! असा घणाघाती प्रहार केला आहे. त्यांनी आणखी एक ट्विट करत जेव्हा निवडणूक आयोगानेच चोरीला वैध ठरवायला सुरुवात केली, तेव्हा लोकशाहीचा नाश होतो हे तुम्हाला माहीत आहे. निवडणूक आयोगाने ही फसवणूक केल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, संपूर्ण तडजोड (EC). ते आता सर्वांना दाखवत आहेत की आपण आता मुक्त आणि निष्पक्ष लोकशाही नाही.
अब की बार 400 पारसाठी केलेला किती हा आटापिटा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मॅच फिक्स, विजेता ठरलेला, अंपायर काय करणार याची कल्पना होती. फक्त चषक कधी द्यायचा हे ठरायचे होते. ते ही आज झाले. अब की बार 400 पारसाठी केलेला किती हा आटापिटा. पडद्यामागील कलाकार अर्थात 'हुडी बाबा' आणि महाशक्तीची यातील भूमिका सर्वांना माहिती आहे. लोक उत्तर देतीलच. बाकी राष्ट्रवादीचा सर्वात आश्वासक चेहरा सक्षम आहेच..
काँग्रेसमधील नेत्यांनी सुद्धा अजित पवार गटाला चिन्ह आणि नाव देण्यावरून प्रहार केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे.
सत्ताधाऱ्यांनी आज 'वेळेला' आव्हान दिले आहे
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, घड्याळाची काटे हाताने उलट्या दिशेने फिरवून सत्ताधाऱ्यांनी आज 'वेळेला' आव्हान दिले आहे. आगामी निवडणुकीत हीच 'वेळ ' हातातील सत्ता हिसकावून सत्ताधाऱ्यांवर वाईट वेळ आणल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. देशात लोकशाहीची थट्टा किती सुरू आहे हे जनतेला दिसत आहे. आधी शिवसेना पक्ष फोडला आता राष्ट्रवादी. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती, शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेब हे समीकरण खोडून काढण्याचा आज प्रयत्न झाला. पण हे जास्त काळ टिकणार नाही. 2024 मधील लढा लोकशाही वाचवण्यासाठी आहे. लोकशाही संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे पण जनता हे होऊ देणार नाही.
लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे, निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे.