Supriya Sule : जो निर्णय निवडणूक आयोगाने  शिवसेनेसाठी दिला तोच निर्णय राष्ट्रवादीला लावत पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. मला काहीच आश्चर्य वाटलं नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयात आम्ही निर्णयाविरोधात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


आमदारांच्या संख्याबळावरून निर्णय होत नसतो


त्या म्हणाल्या की, हा अदृश्यशक्तीचा विजय असून जे शिवसेनेसोबत केलं तेच शरद पवारांसोबत केलं आहे. आमदारांच्या संख्याबळावरून निर्णय होत नसतो. हे अदृश्य शक्तीनं ओरबाडून घेतलं आहे, हे अदृश्य शक्तीचं यश असल्याचे त्यांनी सांगितले. हा अदृश्य शक्तीचा हात आहे हे सांगण्यास फार अवघड नसल्याचे त्या म्हणाल्या. अदृश्यशक्तीचा हात असल्यास निवडणूक आयोगातील अधिकारी काय करणार? अशा शब्दा त्यांनी भाजपवर घणाघात केला. शऱद पवारांनी शुन्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यांनी खूप संघर्ष पाहिला अस्लयाचेही त्या म्हणाल्या. 


देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्वि करत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.


पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे


आमदार रोहित पवार म्हणाले की, केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!


इतर महत्वाच्या बातम्या