Aaditya Thackeray on Chief Secretary Sujata Saunik : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक (Chief Secretary Sujata Saunik) यांच्यावर पदावरून पायऊतार होण्यासाठी भाजप शिंदे सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सुजाता सौनिक यांना हटवण्यावरून गंभीर आरोप केले आहेत.
सुजाता सौनिकांवर पायउतार होण्यासाठी दबाव
आदित्य ठाकरे यांनी (Aaditya Thackeray on Chief Secretary Sujata Saunik) ट्विट करत म्हटले आहे की,सूत्रांनुसार, मदानजी 4 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुख्य सचिव पदावरून पायउतार होऊन राज्यातील निवडणूक आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारण्यसाठी भाजप-मिंधे सरकारकडून खूप दबाव आहे. मुद्दा असा आहे की, का? फक्त त्या एक अतिशय कर्तबगार स्त्री आहेत आणि भाजप/मिंधे यांना ते मान्य नाही म्हणून? त्या फक्त एक महिला आहेत म्हणून तिथं आल्या नाहीत, तर त्यांनी अनेक दशकांची सेवा, अधिकारी म्हणून तिथं पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. 30 जून 2025 रोजी त्या निवृत्त होणार आहेत.
जर बेकायदेशीर मुख्यमंत्री त्यांना बदलू इच्छित असेल तर तो आदेश जारी करू शकतात, पण त्यांना हिम्मत नाही. मग पुढील वर्षी निवृत्ती होणार असतानाही सक्षम अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती घेण्याची सक्ती का करायची? त्यांना झुकण्यासाठी भाग पाडले जाईल का? महाराष्ट्रातील महिलांचा आवाज दाबण्यात मिंधेंची राजवट कुठपर्यंत जाईल?
सुजाता सौनिकांना हटवण्यासाठी दबावतंत्र?
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला अपेक्षित आहे, मात्र त्याआधीच काँग्रेसने मुख्य सचिवांना पायउतार करण्याचा मुद्दा उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवडत्या व्यक्तीला स्थान देण्यासाठी राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवांना हटवण्यात येईल, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सचिन सावत यांनी केला आहे. सावंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दैनिकातील बातमी शेअर केली आहे. त्यांना महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त बनवले जाऊ शकते, असे त्यात म्हटले आहे. नुकतेच अतिरिक्त मुख्य सचिव झालेले इक्बाल सिंग चहल यांची सौनिक यांच्या जागी नियुक्ती केली जाऊ शकते.
चहल यांची सर्वोच्च पदावर नियुक्ती व्हावी यासाठी केलं जात आहे का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाच्या मदतीने चहल यांची सर्वोच्च पदावर नियुक्ती व्हावी यासाठी हे केले जात आहे का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. सावंत यांनी लिहिलं आहे की, आयएएस अधिकारी व्ही राधा यांची नुकतीच बदली कशी झाली हे सर्वांना माहिती आहे? आता मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर मोठा दबाव असल्याने प्रशासन कसे अडचणीत आले आहे, हे दिसून येते. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, असे सावंत यांनी लिहिले आहे. सध्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी यूपीएस मदान हे राज्य निवडणूक आयोगात नियुक्त आहेत. नवीन आयुक्तपदासाठी निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक, नितीन करीर आणि श्रीकांत देशपांडे, राजीव जलोटा आणि राजगोपाल देवरा यांची नावे चर्चेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या