मुंबई : दहा रुपयांची शिवभोजनाची थाळी घेण्यासाठी आधार कार्डची प्रत द्यावी लागणार नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 26 जानेवारीपासून ही योजना राज्यभरात सुरु होणार आहे. त्यासाठी सरकारने आधारकार्ड आणि फोटो गरजेचा असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावर भुजबळ यांनी पडदा टाकला आहे.


26 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या शिवभोजन योजनेसाठी आधार कार्ड घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची बातमी काही माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. परंतु त्या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.

भुजबळ यांनी म्हटले आहे की, 'शिवभोजन' हे गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल.

शासनातर्फे सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी 10 रुपयात देण्यात येईल. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील. ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी राहील. प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान असणार आहे.