शरद पवार, सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह ट्वीट, तरुणाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2017 09:47 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वालचंद गिट्टे या व्यक्तीला आज नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वालचंद गिट्टे या व्यक्तीला आज नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी वालचंद गिट्टे याने थेट शरद पवारांवर आक्षेपार्ह ट्वीट केला होता. इतकंच नाही तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही अश्लील टिप्पणी केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी सुरुवातीला ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर वालचंद गिट्टे याला नागपूरमध्ये अटक करण्यात आली असून नंदनवन पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. वालचंद गिट्टेविरोधात आयटी अॅक्ट अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. वालचंद हा नागपूरमधील खासगी कंपनीत काम करत असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. सध्या पोलीस त्याची याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.