नाशिक : दोन दुर्दैवी घटनांनी नाशिक आज सुन्न झालय. क्रिकेट खेळतांना दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर गॅस गिझरचा स्फोट झाल्याने 58 वर्षीय महिला दगावली. क्रिकेट खेळतांना तोल जाऊन खाली पडल्याने एका दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहरातील गंगापूर परिसरात घडलीय.


शिवाजीनगरमधील कोमल स्वीट्स जवळ असलेल्या रुद्रा अॅव्हेन्यू या सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर शेवाळे कुटुंबीय राहतात, बुधवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास शेवाळे कुटुंबातील गौरव हा चिमुकला घरात क्रिकेट खेळत असतांना बॉल खाली सोसायटीच्या आवारात पडला याचवेळी त्याची आई तो बॉल आणण्यासाठी गेली असता या काही मिनिटांच्या कालावधीतच गौरवचा घराच्या बाल्कनीतून तोल गेला आणि तो थेट खाली रस्त्यावर पडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गौरवला कुटुंबीयांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल होत मात्र उपचाराला तो प्रतिसाद देऊ शकला नाही आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. या संपूर्ण घटनेमुळे शेवाळे कुटुंबासह या परिसरावर शोककळा पसरलीय. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची किती गरज आहे हे या प्रकारातून अधोरेखित होतय. गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करतायत.



दुसरी घटना सातपूर परिसरातील आहे. शिवाजीनगरच्या लाल बहादूर शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या रत्नपारखी या कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. या कुटुंबातील सुरेखा रत्नपारखी या 58 वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झालाय आणि ह्याला कारण ठरलय ते म्हणजे एक गॅस गिझर. 16 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास सुरेखा या अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या असता त्यांनी गरम पाण्यासाठी गॅस गिझर सुरु केलं मात्र पुढे जे काही झालं ते भयानक होतं, आंघोळीसाठी त्या गेल्या असता त्यांनी गॅस गिझर सुरु केलं आणि याचवेळी गिझरचा स्फोट झाला, हा स्फोट ईतका भीषण होता की यात स्लॅबचा काही भाग कोसळला यासोबतच दरवाजाही बराचसा भाग तुटला या घटनेत गंभीर जखमी होऊन 63 टक्के भाजल्याने त्यांना त्यांच्या पतीने जवळीलच एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र संध्याकाळी त्यांना डॉक्तरांनी मयत घोषित केले. सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेखा रत्नपारखी यांचे पती एका खाजगी कंपनीत नोकरीला होते नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा एक मुलगा दिव्यांग असून दुसरा मुलगा एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे.


खरं तर आजपर्यंत गॅस गिझर म्हणा किंवा इलेक्ट्रिक गिझरचा स्फोट होऊन नागरिक गंभीर जखमी होणे किंवा अशाप्रकारे त्यांचा जीव जाण्याच्या अनेक घटना या आजपर्यंत समोर आल्या आहेत आणि नागरिकांकडून या उपकरणांची योग्यप्रकारे हाताळणी न केली गेल्याने किंवा हवी ती काळजी घेतली न गेल्यानेच असे अपघात होत असल्याचं यातून दिसून आलय. रत्नपारखी यांच्याकडे देखील गॅस सिलेंडर हे मोकळ्या जागी ठेवणे अपेक्षित असताना बाथरूम मध्येच ते ठेवण्यात आले होते.


गॅस गिझर हे घरातील मोकळ्या जागी शक्यतो लावावे तसेच सिलेंडरचीही जागा हवेशीर ठिकाणी असावी यासोबतच गॅस गिझरची वर्षातून एकदा तरी सर्व्हिसिंग केली जाणे अपेक्षित असते मात्र तसे होतांना दिसून येत नाही. एकंदरीतच काय तर गॅस गिझर सारख्या वस्तूचा वापर करतांना त्या जेवढ्या सोप्या वाटतात तेवढ्याच त्या घातकही ठरू शकतात हे या सर्व घटनेतून सिद्ध झालय त्यामुळे अशा उपकरणांचा वापर करतांना योग्य ती खबरदारी आणि काळजी घ्या..