जळगाव : भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी, चौकशीसाठी पुण्याच्या कोथरूड पोलिसांचे पथक जळगावमध्ये दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात एकोणतीस पैकी नऊ जणांना मोका अंतर्गत कलम लावण्यात आल्याने या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


जळगाव शहरातील मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक अॅड. विजय पाटील यांनी मराठा विद्या प्रसारक संस्था हडप करण्यासाठी गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून काही जणांनी आपल्याला पुण्यात बोलाऊन अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार  9 डिसेंबरला पोलिसात दिली होती. या घटनेत थेट गिरीश महाजन यांच्यासह त्यांच्या निकटवर्तियांची नावे आल्याने हा विषय राज्यभर चर्चेत आला होता.


या प्रकरणात सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 12 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
या घटनेत गुन्ह्यातील नऊ जणांच्या घरांच्या झडतीसाठी आणि जबाबासाठी पुण्याच्या पथकाने जळगाव शहरात पाच ठिकाणी आज पहाटेपासूनच गोपनीय कारवाई  करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करून आपल्याला अडकवण्याचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले होते. 


या घटनेच्या पार्शवभूमीवर पुण्याच्या पोलीस उप आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता, पुण्यातील कोथरूड येथील दाखल गुन्हा संदर्भात आम्ही जळगाव येथे तपास करण्यासाठी आलो आहोत. तपासाचा भाग असल्याने आम्ही या व्यतिरिक्त कोणतीही माहिती माध्यमांना देऊ शकत नाही, अस सांगत त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आहे.